नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची पालिकेच्या दवाखान्याला अचानक भेट; कर्मचाऱ्यांची उडाली धांदल

। लोकजागर । फलटण । मंगळवार, दि. १० मार्च २०२६ ।

फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी काल शंकर मार्केट येथील नगरपालिकेच्या दवाखान्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक भेट दिली. नगराध्यक्षांनी थेट दवाखान्यात एन्ट्री केल्याने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील सुविधांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.

रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणा नको: दवाखान्याची पाहणी करताना नगराध्यक्षांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. “सर्वसामान्य फलटणकरांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापूर्वी तुम्ही कसे काम करत होता, ते यापुढे अजिबात चालणार नाही. रुग्णांच्या सेवेत आणि कामकाजात कोणताही हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

प्रलंबित प्रश्नांसाठी जागेवरूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क: या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाकडे दवाखान्याचे काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर नगराध्यक्षांनी तात्काळ दखल घेत दवाखान्यातूनच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला आणि हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले.

शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावरून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Spread the love