फलटण तालुक्यात ‘डिजीटल जनगणना’ प्रक्रियेला सुरुवात; प्रशासनाची तयारी पूर्ण

मे-जून २०२६ मध्ये होणार घरगणना; नागरिकांना १ मे पासून स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार.

। लोकजागर । फलटण । २५ एप्रिल २०२६ ।

भारताच्या २०२७ च्या जनगणनेसाठी यंदा पहिल्यांदाच ‘स्वयं जनगणना’ आणि ‘डिजीटल जनगणना’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. फलटण तालुक्यात या प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांनी नागरिकांना यामध्ये सक्रिय सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

यंदाची जनगणना दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात मे-जून २०२६ मध्ये घरगणना व संसाधन गणना केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी नागरिकांचे सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्या विषयक तपशील नोंदवले जाणार आहेत. नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरता येईल. नोंदणीसाठी कुटुंब प्रमुखाचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आवश्यक असून मोबाईल ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करून ३३ प्रश्नांची प्रश्नावली भरावी लागेल. माहिती सादर केल्यानंतर मिळणारा ‘एस.ई. आयडी’ १६ मे ते १५ जून दरम्यान घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणकांना दाखवणे आवश्यक आहे.

या प्रक्रियेसाठी फलटण तालुक्यात ४७१ प्रगणक गट, ४६८ प्रगणक आणि ५८ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे आयोजित केले आहे. प्रगणक प्रथमच मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करणार असून जनगणना कायद्यानुसार ही सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार आहे.

Spread the love