क्रांतीबा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज सुधारण्याचे अग्रदूत; प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांचे प्रतिपादन

मुधोजी महाविद्यालयात ‘भारतीय समाज क्रांतीचे अग्रदूत’ विषयावर विशेष व्याख्यान संपन्न.

। लोकजागर । फलटण । १० मे २०२६ ।

पेशवाईच्या अस्तनंतर १९ व्या शतकात आधुनिक विचार आणि समाज सुधारणेचे वारे वाहू लागले, हा प्रबोधनाचा पूर्व रंग होता. या काळात सर्वप्रथम शिक्षण, ज्ञान आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देऊन क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक सुधारणा व आधुनिक जीवन प्रणालीची हाक दिली. अंधश्रद्धा व दांभिक वृत्तीला कडवे आव्हान देत त्यांनी मुलींची शाळा सुरू केली आणि बहुजन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा कृतीकार्यक्रम आखला, म्हणूनच क्रांतीबा फुले हेच भारतीय समाज सुधारण्याचे खऱ्या अर्थाने अग्रदूत ठरतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले. फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विशेष सप्ताहात ‘भारतीय समाज क्रांतीचे अग्रदूत : क्रांतीबा फुले’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सौ. सरिता माने होत्या. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. नवनाथ रासकर, प्रा. डॉ. अनिल टिके, प्रा. डॉ. अशोक शिंदे आणि प्रा. डॉ. टी. पी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. पवार यांनी पुढे नमूद केले की, क्रांतीबा फुलेंवर थॉमस पेन यांच्या ‘मानवी अधिकार’ या ग्रंथाचा मोठा प्रभाव होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शिक्षण प्रसार आणि समाज सुधारणेवर भर दिला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी जो विचार दिला, त्यातूनच पुढे राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगेबाबा यांसारख्या महापुरुषांनी समाज परिवर्तनाचे कार्य पुढे नेले. विज्ञानाचा ध्यास घेऊन आयुष्य सुधारणावादी केले पाहिजे, असा फुले यांचा आग्रह होता, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सौ. सरिता माने यांनी स्पष्ट केले की, भारताला समाज सुधारणेची नितांत आवश्यकता असताना क्रांतीबा फुलेंनी शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व ओळखले. स्त्रियांचा विकास आणि समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व भोंदूगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाद्वारे केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अंकुश खोब्रागडे यांनी करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Spread the love