शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना १) डॉ. सतिश फरांदे, २) सौ. दमयंती कुंभार.
। लोकजागर । फलटण । दि. ०४ मार्च २०२५ ।
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण व पंचायत समिती फलटण शिक्षण विभागातर्फे श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, फलटण मध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न झाले.
या प्रशिक्षणासाठी फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे अधिव्याख्याता डॉ. सतिश फरांदे, फलटण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विषयतज्ञ सौ. दमयंती कुंभार यांनी शिक्षण विषयक क्षेत्रे, स्कॉफ परिशिष्टे 1 ते 8 या विषयी माहिती देऊन सखोल असे मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील, खाजगी शिक्षण संस्थेतील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिकच्या सर्व अनुदानित म्हणजेच इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व शिक्षकांचा सहभाग होता. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयक वैशिष्ठ्ये, स्वरूप, कौशल्य, राबवणूक, शालेय शिक्षण नवीन आकृतिबंध (5+3+3+4), समग्र प्रगती पत्रक आदी विषयी सविस्तर माहिती यावेळी प्राथमिकचे सुलभक म्हणून सौ.कुंभार, श्री. लटिंगे, श्री. भोसले, श्री. नाळे व माध्यमिक सुलभक म्हणून श्री. सस्ते, श्री. शिपटे, श्री. सावंत, श्री. कावळे, श्री. मिलिंद शिंदे, सौ. कांबळे, सौ. निंबाळकर यांनी दिली.
सुलभक मिलिंद शिंदे व इतर शिक्षक सहकार्यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन यशस्वीरीत्या पार पडले.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांनी प्रशिक्षण स्थळी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘‘नुसते पुस्तकी शिक्षण घेऊन उपयोग नाही त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणे गरजेचे आहे. ही काळाची गरज असून त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.’’
या प्रशिक्षणामधून नवनवीन संकल्पना शिकण्यास मिळाल्या ज्यांचा वापर विद्यार्थी घडवण्यासाठी उपयुक्त आहे, अशा प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी दिल्या.
यावेळी डॉ. सतिश फरांदे यांनी फलटण एजुकेशन सोसायटीचे व प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांचे शिबीरासाठी भौतिक सुविधा उपलब्ध केल्याबद्दल आभार मानले. प्रशिक्षण शिबीराच्या यशस्वी संयोजनासाठी श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय वेदपाठक, मनोज कदम, उत्तम घोरपडे, योगेश भिसे यांनी सहकार्य केले.