वेतन पथकामार्फत कोट्यावधींची प्रलंबित देयके अदा
। लोकजागर । सातारा । दि. 8 जून 2025 ।
सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील वेतन पथकाचे अधीक्षक सुनिल शिखरे यांच्या तत्परतेमुळे कोट्यावधी रुपयांची थकीत रक्कम संबंधित कर्मचार्यांच्या खात्यात वर्ग झाली असून यामुळे कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्हा परिषदेकडे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी, कालबद्ध पदोन्नती मान्यता, वैद्यकीय देयके, पुरवणी देयके आदी प्रकारची देयके मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होती. वेतन पथकाचे अधीक्षक सुनिल शिखरे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत सन 2024 – 25 या आर्थिक वर्षात अशा कोट्यावधी रुपयांच्या प्रलंबित देयकांचा निपटारा केल्याने माध्यमिक कर्मचार्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालयाचे वैद्यकीय बिल 3 कोटी 85 लाख 49 हजार 834 रुपये व उच्च माध्यमिक शाळा यांचे 55 हलाख 50 हजार 355 रुपये, त्याचबरोबर अध्यापक विद्यालय, सराव पाठशाळा या सर्वांचे मिळून 4 कोटी 42 लाख 10 हजार 408 रुपये संबंधित कर्मचार्यांच्या खात्यामध्ये वैद्यकीय देयकापोटी जमा करण्यात आले आहेत. तसेच माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक पाठशाळा, सराव पाठशाळा या सर्व विद्यालयांचे थकीत देयकापोटी 24 कोटी 60 लाख 15 हजार 268 रुपयांना शासन स्तरावरुन मान्यता घेवून सदरची रक्कम संबंधित कर्मचार्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. या कामासाठी शिक्षणाधिकारी व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती सुनिल शिखरे यांनी दिली आहे.

दरम्यान, सुनील शिखरे यांच्या मासिक वेतन बिले तालुका स्तरावर एकत्रितपणे स्वीकारण्याच्या संकल्पनेमुळे जिल्हा परिषद मध्ये लिपिकांचे होणारे हेलपाटे कमी झाले आहेत. त्यामुळे लिपिक वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.
