। लोकजागर । सातारा । दि. २ जानेवारी २०२६ ।
सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, शुक्रवारी फलटणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. फलटण नगरपरिषदेत भाजपाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशावर आज साक्षात मुख्यमंत्री कौतुकाची मोहोर उमटवणार असल्याने फलटणच्या राजकीय वर्तुळात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर आहेत. निर्धारित वेळापत्रकानुसार, दुपारी १:३० वाजता मुख्यमंत्री मोटारीने जिल्हा परिषदेकडे प्रयाण करतील. त्यानंतर १:३५ वाजता जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात त्यांचे आगमन होईल. याच ठिकाणी सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा विशेष गौरव केला जाणार आहे.
