निंबळक व पिंपरदच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवा भारती तर्फे आकर्षक आकाश कंदील कार्यशाळा संपन्न; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पांतर्गत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांनी स्वतः बनवले सुंदर आकाश कंदील.

। लोकजागर वृत्त । फलटण । २३ ऑक्टोबर २०२६ ।

सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत अंतर्गत फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प फलटण यांच्यावतीने बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक व पिंपरद या दोन्ही ठिकाणी ‘आकाश कंदील कार्यशाळा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या शिंदे यांनी सेवा भारती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पाच्या सदस्यांचे स्वागत व परिचय करून दिला.

यानंतर सुषमा काटे व रेवती गोसावी यांनी विद्यार्थ्यांचे प्रत्येकी दहा मुलांचे गट तयार करून निंबळक शाळेत आठ गट आणि पिंपरद शाळेत सात गट पाडले. प्रत्येक गटाला आकाश कंदील बनवण्याचे आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले आणि सर्व मुलांकडून अत्यंत आकर्षक व सुंदर आकाश कंदील तयार करून घेण्यात आले. या सृजनात्मक आणि कौशल्यपूर्ण कार्यशाळेसाठी प्रकल्प समितीचे ५ सदस्य, १४५ विद्यार्थी, १३ शिक्षक आणि १ हितचिंतक असा एकूण १६४ जणांचा सक्रिय सहभाग लाभला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळाला. फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प प्रमुख पोपटराव बर्गे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love