फलटणचे प्रसिद्ध डॉक्टर सुहास म्हेत्रे यांचे निधन; रुग्णसेवेचा वारसा जपणारा सुहृद हरपला

शंकर मार्केट परिसरासह मित्र परिवारात हळहळ

। लोकजागर । फलटण । दि. ११ फेब्रुवारी २०२६ ।

शहरातील शंकर मार्केट परिसरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुहास रामचंद्र म्हेत्रे (वय ६०) यांचे काल, मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:०० वाजता पुण्यात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने फलटणच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक मनमिळावू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असून शहरात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

डॉ. सुहास म्हेत्रे हे जुन्या पिढीतील नामवंत कै. डॉ. रामचंद्र म्हेत्रे यांचे चिरंजीव होते. वडिलांनी शंकर मार्केट येथे अत्यंत निष्ठेने आणि ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता. हाच वारसा डॉ. सुहास यांनी तितक्याच समर्थपणे पुढे चालू ठेवला होता. केवळ व्यवसाय न पाहता रुग्णांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, हॉकी व पर्यटनाची विशेष आवड आणि त्यांचा सौम्य स्वभाव यामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार आणि रुग्णवर्ग जोडला होता. वैद्यकीय क्षेत्रासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन भाऊ आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. डॉ. म्हेत्रे यांच्या निधनाची बातमी समजताच फलटणमधील वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर आज, बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वाजता फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा दुपारी १२:०० वाजता शंकर मार्केट येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

Spread the love