नवीन वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांबांच्या कामांसाठी NOC घेणे बंधनकारक करण्याची आक्रमक मागणी; ठेकेदारांच्या मनमानी कामांमुळे विकासकामांना अडथळे येत असल्याचा गंभीर आरोप.
। लोकजागर वृत्त । फलटण । १९ ऑक्टोबर २०२६ ।
फलटण नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणकडून नवीन वीजवाहिन्या टाकणे, ट्रान्सफॉर्मर बसविणे, नवीन विद्युत खांब उभारणे तसेच खांब स्थलांतरित करण्याच्या कामांबाबत फलटण नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा कामांचे आदेश देण्यापूर्वी नगरपरिषदेचा ना हरकत दाखला (NOC) घेण्याची मागणी करूनही त्याचे पालन होत नसल्याचा थेट आक्षेप नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी नोंदविला आहे. यापुढे नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय किंवा अनधिकृतपणे कामे केल्यास महावितरण आणि संबंधित ठेकेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा कडक आणि स्पष्ट इशारा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपरिषद येथे एक विशेष बैठक आयोजित केली होती, ज्यामध्ये शहरातील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर महावितरणच्या फलटण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठविण्यात आले असून शहरातील वाढती लोकसंख्या, व्यापारी विस्तार आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन महावितरणच्या कामकाजासंदर्भात आवश्यक सूचना व प्रस्तावांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेने यापूर्वी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्राद्वारे महावितरणला विविध सूचना दिल्या होत्या, ज्यातील मुद्दा क्रमांक ९ नुसार नगरपरिषद हद्दीत नवीन वीजवाहिन्या टाकणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, नवीन विद्युत खांब उभारणे किंवा विद्यमान खांब स्थलांतरित करणे अशा कामांपूर्वी नगरपरिषदेचा ना हरकत दाखला घेण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली होती. मात्र संबंधित कामांचे आदेश देण्यापूर्वी महावितरणकडून नगरपरिषदेचा NOC घेतला जात नसल्याचे १५ ऑक्टोबरच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नगरपरिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महावितरण व संबंधित ठेकेदार यांच्याकडून मनमानीपणे शहरात कामे सुरू असल्याने यापूर्वी दिलेल्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणने नियुक्त केलेले ठेकेदार आपल्या सोयीनुसार कामे करीत असल्याचा आक्षेप नगरपरिषदेने घेतला असून अशा कामांमुळे शहरातील विकासकामे करताना मोठे अडथळे निर्माण होत आहेत. रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी कामांच्या नियोजनाशी समन्वय न साधता विद्युत कामे केली जात असल्यास त्याचा थेट परिणाम नगरपरिषदेच्या विकासकामांवर होत आहे. शहराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेता महावितरणच्या कामांचे नियोजन नगरपरिषदेशी समन्वय साधून होणे अत्यंत आवश्यक असल्याचे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. फलटण नगरपरिषद हद्दीत महावितरणकडून विनापरवाना कामे सुरू असल्याचा आरोप पत्रात करून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापुढे नगरपरिषद हद्दीत कोणतेही काम विनापरवाना किंवा अनधिकृतपणे केल्यास संबंधित महावितरण विभाग आणि ठेकेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.
