तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा; प्रलंबित कामांबाबत महावितरण व प्राधिकरणाला तातडीचे निर्देश.
। लोकजागर वृत्त । फलटण । १७ ऑक्टोबर २०२६ ।
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने फलटण तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत असून तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू दिले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) उपविभाग फलटण अंतर्गत तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांच्या कामांची तसेच उपलब्ध पाणीसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांना या साठवण तलावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनावर या वेळी विशेष भर देण्यात आला आहे.
या पाहणीदरम्यान विडणी, निंबलक, पिंप्रद, राजाळे, सोमंथळी, गिरवी, धुळदेव आणि वाठार निंबाळकर येथील पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे निदर्शनास आले, मात्र सोनगाव आणि सरडे येथील साठवण तलावांना अद्याप विद्युतपुरवठा जोडण्यात आलेला नसल्याने ते पूर्णपणे रिकामε असल्याचे आढळले. तसेच शिंदेवाडी येथील साठवण तलावाच्या कामात विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्याचे काम प्रलंबित असल्याचेही समोर आले. या सर्व प्रलंबित कामांची गंभीर दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून सोनगाव, सरडे आणि शिंदेवाडी येथील कामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास नीरा उजवा कालव्याचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, होळ-खामगाव, निंभोरे, सस्तेवाडी आणि ठाकूरकी-फरांदवाडी येथील पाणी साठवण तलावांची कामे सध्या प्रगतिपथावर असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या साठवण तलावांमधून टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा करणे अत्यंत सुलभ होणार आहे, त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि तालुक्यातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित लाभक्षेत्रांतील नागरिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
