२४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन
। लोकजागर वृत्त । फलटण । १९ ऑक्टोबर २०२६ ।
फलटणकरांसह परिसरातील नागरिकांसाठी खरेदी, विविध खाद्यपदार्थ, लावणी नृत्य, बहारदार हिंदी-मराठी गाणी आणि ऑटोमोबाईल्सच्या भव्य प्रदर्शनाची अनोखी संधी घेऊन ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर श्री सद्गुरू हरिबाबा नगरीत, एस.टी. स्टँडसमोर, फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी दिली आहे. यावेळी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
राजकारण आणि कोविड अशा विविध कारणांमुळे मध्यंतरी दहा वर्षे बंद पडलेल्या या महोत्सवाला पूर्ववत सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या बैठकीत झाली होती. त्यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या फेस्टिव्हलचे पुनरालोचन करण्यात येत असून यापुढे दरवर्षी हा फेस्टिव्हल आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात गृहोपयोगी साहित्य, कपडे, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, लहान मुलांसाठी खेळाची साधने, ऑटोमोबाईल्सचे प्रदर्शन, भव्य डान्स स्पर्धा, होम मिनिस्टर पैठणी शो आणि दापोली येथील प्रसिद्ध लावणी नृत्यांगनांचा लावणी महोत्सव असे विविधांगी कार्यक्रम असणार आहेत.
या महोत्सवाची वेळ सकाळी ११ ते रात्री १० अशी असून, व्यापारी, व्यावसायिक आणि लघुउद्योजकांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मोठे व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. महोत्सवाची संपूर्ण रूपरेषा उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी स्पष्ट केली असून, नागरिकांनी सहकुटुंब या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन फलटण फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ आणि कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.
