फलटणकरांना आज १८८ वर्षांनंतर घडणार संत गोदडनाथ महाराजांच्या पादुकांचे दर्शन

। लोकजागर । फलटण । दि. २३ फेब्रुवारी २०२६ ।

फलटण नगरीच्या आध्यात्मिक इतिहासातील एक अत्यंत भाग्याचा आणि मंगलमय क्षण आज अनुभवायला मिळणार आहे. श्री संत सद्गुरु गोदडनाथ महाराज यांच्या दिव्य पादुका तब्बल १८८ वर्षांनंतर पहिल्यांदाच फलटण नगरीत येत असून, आज सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी श्रीराम मंदिरात फलटणकरांना या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. श्रीमंत नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री संत सद्गुरु गोदडनाथ महाराज आणि फलटणचे नाईक निंबाळकर राजघराणे यांचे अत्यंत जुने आणि भक्तीचे ऋणानुबंध आहेत. सद्गुरूंनी फलटणच्या राजवाड्यात आणि मंदिरात सलग १२ वर्षे वास्तव्य केले होते. तसेच फलटण ते पंढरपूर अशी १२ वर्षे भव्य वारीही त्यांनी केली होती. या वारीसाठी लागणारी पताका, टाळ, रथ आणि इतर सर्व सामग्री नाईक निंबाळकर राजघराण्याने सद्गुरूंच्या चरणी अर्पण केली होती. विशेषतः पुण्यश्लोक राजमाता सगुणा बाईसाहेब नाईक निंबाळकर यांनी महाराजांची अत्यंत निष्ठेने सेवा केली होती, ज्याचा उल्लेख सद्गुरूंच्या ग्रंथामध्ये एका स्वतंत्र अध्यायात आढळतो.

पांडुरंगाच्या आदेशाने कर्जत येथे संजीवन समाधी घेतलेल्या सद्गुरूंच्या दिव्यत्वाची प्रचिती आजही अनेक भाविकांना येते. अशा या थोर संतांच्या पादुकांचे आज सकाळी ९.०० वाजता बारामती चौक येथे वाजतगाजत स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर या पादुका दर्शनासाठी श्रीराम मंदिरात ठेवल्या जातील. १८८ वर्षांनंतर हा योग जुळून आल्याने फलटणमधील भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love