फलटणमध्ये ‘सुखकर्ता NGO’च्या मदतीने वासराचे प्राण वाचले; चारचाकीच्या धडकेने पाय गमावला

रायगड हॉटेलजवळ घडली घटना; डॉक्टरांनी तातडीने केले उपचार, वाहनचालकाने संस्थेला माहिती दिल्यामुळे अनर्थ टळला

। लोकजागर । फलटण । दि. २३ फेब्रुवारी २०२६ ।

फलटण शहरातील रायगड हॉटेलजवळ काल, रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका चारचाकी वाहनाने एका फिरस्त्या वासराला जोरदार धडक दिली. या धडकेत वासराचा पुढचा पाय गंभीर जखमी झाला असून, अर्ध्या पायाचे हाड तुटून बाहेर आले होते. या दुर्दैवी घटनेची माहिती ज्या वाहनचालकाने वासराला धडक दिली, त्यांनी तात्काळ ‘सुखकर्ता NGO, फलटण’ संस्थेला दिली. संस्थेला माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सुखकर्ता NGO च्या डॉक्टरांनी तत्काळ वासराला आवश्यक वैद्यकीय उपचार दिले. मात्र, अर्ध्या पायाचे हाड पूर्णपणे तुटून बाहेर आल्यामुळे प्लास्टर करणे शक्य नसल्याचे संस्थेच्या डॉक्टरांनी आणि शिरवळ येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे दुर्दैवाने वासराचा तो पाय शस्त्रक्रिया करून कापून टाकावा लागला आहे. आता या वासराला उर्वरित आयुष्य तीन पायांवरच काढावे लागणार आहे. पुढील दहा दिवस या वासरावर नियमित उपचार सुरू राहणार असून, ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी आशा ‘सुखकर्ता NGO’ ने व्यक्त केली आहे.

या घटनेच्या निमित्ताने ‘सुखकर्ता NGO’ ने वाहनचालकांना आवाहन केले आहे की, गाडी नेहमी काळजीपूर्वक आणि सावकाश चालवावी, जेणेकरून अशा निष्पाप मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात येणार नाहीत. संस्थेने या प्रसंगी मोलाची मदत करणारे डॉ. शुभम राजेशिर्के आणि फलटण गोसेवा विभाग यांचे विशेष आभार मानले आहेत. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सार्वजनिक जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे.

Spread the love