। लोकजागर । फलटण । दि. ३ मार्च २०२६ ।
फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण या प्रशालेत २८ फेब्रुवारी रोजी ‘विज्ञान दिना’चे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शन व कलादालनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ठीक ९:३० वाजता प्रशालेच्या चेअरमन सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सौ. नूतन शिंदे, निमंत्रित सदस्या निर्मला रणवरे, मुद्रण संस्था चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रशालेचे मुख्याध्यापक रूपेश शिंदे , स्वर्गीय शिलादेवी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. काकडे आणि नवीन प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. शेख या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विविध नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांची माहिती प्रमुख पाहुण्यांना सविस्तरपणे देऊन सर्वांची मने जिंकली. विज्ञान प्रयोगांसोबतच कलादालनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलात्मक हस्तकला आणि सुंदर मांडणीचे दर्शन घडले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि कलेची आवड निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षक वृंदाच्या सहकार्याने हा विज्ञान दिन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
