। लोकजागर वृत्त । फलटण । १६ जुलै २०२६ ।
माणूस जन्माने मोठा होत नसून तो आपल्या विचारांनी, चारित्र्याने आणि कर्तृत्वाने मोठा होतो, या विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले होत. ज्ञान, संस्कार, राष्ट्रप्रेम आणि माणुसकीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांची व्याख्याने आणि साहित्य आजही विद्यार्थी, शिक्षक व समाजाला प्रेरणा देत असून, आजच्या युवकांनी त्यांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे माजी अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले.
सुप्रसिद्ध वक्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेच्यावतीने १५ जुलै रोजी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे आणि महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य रविंद्र बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना शांताराम आवटे यांनी सांगितले की, प्राचार्य भोसले यांच्या अमोघ वाणीतील विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्रोते आवर्जून उपस्थित राहत असत. त्यांच्या भाषणात प्रबोधन, विनोद आणि वास्तवाला भिडणारे मार्मिक संदर्भ यांचा सुरेख संगम असे. हे व्यक्तिमत्त्व सातत्यपूर्ण वाचन, चिंतन आणि मननातून घडले होते. आजच्या विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) अतिरेक टाळून वाचनाची सवय जोपासली पाहिजे. आयुष्य सुखी आणि समृद्ध बनवायचे असेल, तर प्राचार्य भोसले यांच्यासारख्या सुसंस्कृत विचारवंतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमात बोलताना महादेवराव गुंजवटे यांनी नमूद केले की, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून फलटणचे नाव देश-विदेशात पोहोचविले. वाचन, लेखन, मनन आणि आदर्श व्यक्तींचा सहवास हीच त्यांच्या यशाची खरी शिदोरी होती. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतून त्यांनी आपल्या जीवनाची दिशा मिळवली. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या थोर व्यक्तींच्या सहवासातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला व्यापक दृष्टी लाभली होती.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी पुण्यातील प्रतिष्ठेच्या वसंत व्याख्यानमालेत सलग अठरा वर्षे व्याख्यान देण्याचा ऐतिहासिक मान मिळविला असून, असा बहुमान मिळविणारे ते एकमेव वक्ते ठरले. गरीब व गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी विविध सवलत योजना राबवून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य केले. दीपस्तंभ, जीवनवेध आणि प्रेरणा यांसारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी साहित्यविश्वातही आपले अद्वितीय योगदान दिले. त्यांच्या याच शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करून त्यांचा गौरव केला होता, असेही गुंजवटे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन विशाल मुळीक यांनी केले, तर अशोक सस्ते यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
