आज आणि १४ मार्च रोजी फलटण तालुक्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरांचा’ धडाका; शासकीय योजनांचा लाभ आता एकाच छताखाली!

तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांचे आवाहन; ७/१२ अद्ययावत करण्यासह विविध दाखल्यांचे जागीच वाटप होणार

। लोकजागर । फलटण । शनिवार, दि. ७ मार्च २०२६ ।

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी फलटण तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा पहिला टप्पा आज, शनिवार दि. ७ मार्च आणि दुसरा टप्पा पुढील शनिवारी दि. १४ मार्च रोजी तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.

आज (७ मार्च) येथे होणार शिबिरे:

  • गिरवी मंडळ: कुरवली खुर्द ग्रामपंचायत कार्यालय.
  • कोळकी मंडळ: आशीर्वाद मंगल कार्यालय, ठाकूरकी.
  • बरड मंडळ: नाथाचे मंदिर, राजुरी.
  • आसू मंडळ: खंडोबा मंदिर, साठे फाटा.
  • राजाळे मंडळ: मारुती मंदिर, राजाळे.

पुढील शनिवारी (१४ मार्च) येथे होणार शिबिरे:

  • तरडगाव मंडळ: जुनी ग्रामपंचायत चावडी, तरडगाव.
  • आदर्की बुद्रुक मंडळ: भैरवनाथ मंदिर, आदर्की बुद्रुक.
  • होळ मंडळ: दत्त मंदिर, काळज.
  • वाठार निंबाळकर मंडळ: विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ताथवडा.

एकाच छताखाली मिळणाऱ्या सेवा: या शिबिरांमध्ये जिवंत ७/१२ मोहीम, वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वितरण, ई-मोजणी, प्रॉपर्टी कार्ड वाटप आणि पी.एम. किसान योजनेची ई-केवायसी यांसारखी महत्त्वाची कामे तात्काळ निकाली काढली जाणार आहेत. प्रशासकीय यंत्रणा थेट नागरिकांच्या दारात येत असल्याने या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले आहे.

Spread the love