राज्यातील नामांकित अकॅडमींचा सहभाग; अंडर-१२ आणि अंडर-१४ गटांसाठी लेदर बॉल क्रिकेटचे महायुद्ध.
। लोकजागर । फलटण । १ मे २०२६ ।
फलटण एज्युकेशन सोसायटी आणि क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “गोविंद चषक” लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे तिसरे पर्व यंदा दि. ३ मे ते २० मे २०२६ या कालावधीत रंगणार आहे. फलटण येथील माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, शिंगणापूर रोड येथील मैदानावर ही स्पर्धा पार पडणार असून, यामध्ये १२ वर्षांखालील (U-12) व १४ वर्षांखालील (U-14) वयोगटातील खेळाडूंचा समावेश आहे.
स्पर्धेचे वैशिष्ट्य आणि ड्रॉ प्रक्रिया: सातारा जिल्ह्यात १२ वर्षांखालील मुलांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारा हा पहिलाच उपक्रम ठरला असून, लहान वयातील खेळाडूंना यामुळे दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेची अधिकृत ड्रॉ (सोडत) प्रक्रिया श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते नुकतीच संपन्न झाली. यावेळी फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, अरविंद निकम, दशरथराव नाईक निंबाळकर, अशोक गाडगीळ, आर्यन गाडगीळ आणि अवि कांबळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
अंडर-१२ (U-12) गटाची विभागणी: या वयोगटात एकूण दोन गट करण्यात आले असून त्यामध्ये खालील संघांचा समावेश आहे:
- गट अ : क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘बी’, अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘ए’ आणि नेरळकर क्रिकेट अकॅडमी (औरंगाबाद).
- गट ब : प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी (सातारा), क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘सी’, राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी आणि बारामती स्मॅशर्स.
अंडर-१४ (U-14) गटाची विभागणी: या वयोगटातही राज्यभरातील नामांकित संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे:
- गट अ : सारा क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘सी’, मिलिंद गुंजाळ स्पोर्ट्स अकॅडमी, बारामती स्मॅशर्स आणि राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी.
- गट ब : रायझिंग क्रिकेट अकॅडमी, नेरळकर क्रिकेट अकॅडमी (औरंगाबाद), क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘ए’, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘बी’ आणि प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी (सातारा).
ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी ही स्पर्धा एक सुवर्णसंधी असून, भविष्यातील दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
