सृष्टी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित या साहसी उपक्रमात फलटण रायडर्सच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्यदायी जीवनशैलीचा जागर केला.
। लोकजागर । फलटण । २४ मार्च २०२६ ।
फलटण ते वारुगड या निसर्गरम्य आणि रोमांचक मार्गावर सायकलिंग व ट्रेकिंग मोहिमेचा नुकताच २१ मार्च रोजी यशस्वी समारोप झाला. सृष्टी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सहभागी सायकलपटूंनी प्रचंड उत्साह, एकजूट आणि साहसी वृत्तीचे दर्शन घडवले. ऐतिहासिक वारुगड किल्ल्याच्या दिशेने निघालेल्या या राईडमध्ये निसर्गाचा आनंद घेत तरुणाईने शारीरिक क्षमतेचा कस लावला.
या मोहिमेत फलटण रायडर्सचे अध्यक्ष कोकाटे साहेब यांच्यासह मिसाळ साहेब, डॉ. खंडेलवाल, पाटील सर आणि चोरमले साहेब यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. फलटण रायडर्सच्या सर्व सदस्यांनी या राईडमध्ये सहभागी होऊन उपक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमाच्या माध्यमातून “सायकल चालवा – इंधन वाचवा” आणि “सायकल चालवणे हीच खरी देशसेवा” असा मोलाचा सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. केवळ छंद म्हणून नव्हे तर इंधन बचतीसाठी सायकलचा वापर करणे काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
आरोग्याप्रती जनजागृती करणे आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. अशा प्रकारचे धाडसी आणि आरोग्यदायी उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवून फलटणमधील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प आयोजकांनी यावेळी व्यक्त केला आहे. यशस्वी राईडनंतर सर्व सहभागी सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
