फलटणमध्ये श्रीमंत महारुद्र पंचमुखी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन; कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

नाळेमळा, अक्षत रेसिडेन्सी व जाधववाडी परिसरात भक्तीमय वातावरण; २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता होणार जन्मोत्सव सोहळा.

। लोकजागर । फलटण । ३१ मार्च २०२६ ।

फलटण शहरातील नाळेमळा, अक्षत रेसिडेन्सी आणि जाधववाडी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत महारुद्र पंचमुखी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून सर्व भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ह.भ.प. शंकर महाराज शिंदे (तिरकवाडीकर) यांची सुश्राव्य कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी मुख्य जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार असून, त्या दिवशी पहाटे ५ वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पहाटे ५:१५ वाजता मारुती रायाचा अभिषेक आणि ६ वाजून ५ मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडेल. सायंकाळी ७ वाजता भव्य महाआरती संपन्न झाल्यानंतर ७:३० वाजल्यापासून सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादासाठी श्री. मनोज शिंदे (9579999711) आणि श्री. महेश कारंडे (9421962899) यांच्याकडे स्वेच्छेने देणगी स्वीकारली जाणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमांसोबतच अक्षत रेसिडेन्सीमधील गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कामही हाती घेण्यात आले असून, भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. श्रीमंत महारुद्र पंचमुखी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या सर्व कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी सहकुटुंब सहपरिवार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love