अजितदादा पवार व आशा भोसले यांना श्रद्धांजली; ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानातील विजेत्यांचा आणि निरगुडीच्या सुकन्येचा विशेष गौरव.
। लोकजागर । फलटण । १६ एप्रिल २०२६ ।
फलटण पंचायत समितीची एप्रिल महिन्याची मासिक सभा नुकतीच सभापती कु. शिवांजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. नूतन सभापती व उपसभापतींच्या निवडीनंतर झालेली ही पहिलीच अधिकृत मासिक सभा असल्याने तालुक्याचे या सभेकडे लक्ष लागले होते. या सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी भूमिकेतील शिवसेना अशा अटीतटीच्या राजकीय समीकरणांनंतरही विविध विकासकामांचा आढावा खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आला.
दिग्गजांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली: सभेच्या सुरुवातीलाच मागील कालावधीत निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून दुखवट्याचा ठराव घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि पद्मविभूषण गायिका आशा भोसले यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना संपूर्ण सभागृहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विविध विभागांचा आढावा आणि ‘समृद्ध पंचायतराज’: सभेमध्ये शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, पशुसंवर्धन आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्याचे ठरले. शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांच्या कामाची तपासणी करून उत्कृष्ट ग्रामपंचायतींना बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोंडके यांनी मार्गदर्शन केले.
शैक्षणिक यशाचा आणि निरगुडीच्या सुकन्येचा गौरव: ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा सभेत अभिनंदनाचा ठराव करून गौरव करण्यात आला.
- जिल्हा परिषद शाळा गट: प्रथम – जि.प. शाळा माझेरी, द्वितीय – जि.प. शाळा कापशी, तृतीय – जि.प. शाळा फडतरवाडी.
- खाजगी शाळा गट: प्रथम – साखरवाडी हायस्कूल, द्वितीय – यशवंतराव चव्हाण हायस्कूल (फलटण), तृतीय – तरडगाव हायस्कूल.
याशिवाय, निरगुडी येथील कु. सस्ते हिची ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट ऑफ पुणे’ यामध्ये महाराष्ट्र राज्यातून एकमेव मुलगी म्हणून निवड झाली आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सभेमध्ये विशेष अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सभेचे कामकाज उपसभापती श्री. अमोल सस्ते, गटविकास अधिकारी श्री. प्रकाशकुमार बोंबले आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले.
