२२ हजार स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण; बँकांकडून १२०० कोटींहून अधिक अर्थसहाय्य.
। लोकजागर । सातारा । १६ एप्रिल २०२६ ।
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सातारा जिल्ह्याने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ९० हजार महिला आता ‘लखपती दीदी’ झाल्या असून, त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाचा विविध स्तरांवरील निधी आणि बँकांचे भक्कम अर्थसहाय्य यामुळे ग्रामीण भागातील महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात हे अभियान सुरू झाल्यापासून महिलांच्या संघटनावर मोठा भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार १८७ स्वयंसहायता समूह (बचत गट) तयार करण्यात आले असून, यामध्ये २ लाख २१ हजार ३८० कुटुंबांचा समावेश झाला आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत २ हजार ३७७ बचत गटांमधील महिलांना प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी १२२ कोटी २६ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय, २१ हजार ६६४ गटांना ३२ कोटी ५१ लाखांचा फिरता निधी, तर ३३३ ग्रामसंघांना ३ कोटी ७४ लाख रुपये प्रदान करण्यात आले आहेत.
बँकांचे मोठे पाठबळ आणि निधी वितरण: महिला बचत गटांना बँकांनीही मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा करून उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले आहे. आकडेवारीनुसार, ५६ हजार ६२७ बचत गटांना १२०० कोटी ६ लाख ६३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. तसेच ६ हजार १६१ गटांना वैयक्तिक उद्योग व्यवसायासाठी १०० कोटी ९ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त स्टार्टअप निधी म्हणून १ हजार २१४ गटांना ९ कोटी १० लाख आणि ६२ प्रभाग संघांना २ कोटी १७ लाख रुपये मिळाले आहेत.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळाली नवी दिशा: ‘उमेद’ अभियानामुळे ग्रामीण भागातील महिला केवळ घराबाहेर पडल्या नाहीत, तर त्या आता यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास येत आहेत. जिल्ह्यातील या ‘लखपती दीदी’ आता केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता विविध प्रकारचे छोटे-मोठे उद्योग, गृहउद्योग आणि सेवा क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. यामुळे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी उभारी मिळाली आहे.
