माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण; सुंदरगिरी महाराज व संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत होणार कलशारोहण.
। लोकजागर । फलटण । २१ एप्रिल २०२६ ।
फलटण शहरातील रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून, त्यानिमित्त भव्य लोकार्पण आणि कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २२ एप्रिल ते शुक्रवार, दि. २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा परिसर भक्तिमय होणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून गोविंद प्लाझा समोरील मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली असून, फलटणकरांसाठी हा एक मोठा आध्यात्मिक उत्सव ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्रींच्या मूर्ती व कलश आगमनाने होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता भव्य नगर प्रदक्षिणा व कलश शुभयात्रा काढण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी, २३ एप्रिल रोजी दुपारी वीरशैव महिला भजनी मंडळाचे भजन आणि सायंकाळी मुख्य देवता स्थापना पूजन, जलाभिषेक व उदकशांती असे विधी पार पडतील. रात्री माणकेश्वर भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होईल. सोहळ्याच्या अंतिम दिवशी, २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मंदिर वास्तुशांती व हवन पूर्णाहुती होणार असून, दुपारी ४ वाजता मूर्ती व कलश प्रतिष्ठापना केली जाईल. सायंकाळी ५ वाजता महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कलशारोहण विधी श्री सेवागिरी महाराज देवस्थान, पुसेगांवचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि श्री शिवप्रतिष्ठान – हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर भूषविणार असून, यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य सह्याद्री कदम, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक हेमंत निंबाळकर, के.बी. उद्योग समूहाचे चेअरमन सचिन यादव, नगरसेवक पंकज पवार आणि नगरसेविका सौ. कविता मदने या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
रविवार पेठ तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले, उपाध्यक्ष किरण शहाणे आणि मार्गदर्शक मोहनराव पोतेकर यांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी फलटण शहरातील सर्व गणेशभक्तांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या नूतनीकरणामुळे रविवार पेठेच्या वैभवात भर पडली असून, तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक विधींमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
