सहयोग निवासस्थानी सदिच्छा भेट; ‘इंटरनॅशनल’ व ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मधील नोंदीबद्दल सुनेत्रा पवारांकडून कौतुक व शुभेच्छा.
। लोकजागर वृत्त । फलटण । २४ सप्टेंबर २०२६ ।
फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली शहा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सहयोग निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. अवघ्या २१ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून येत विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल सिद्धाली शहा यांची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे. ही निश्चितच संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सिद्धाली शहा यांना पदक व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. अत्यंत कमी वयात सार्वजनिक जीवनात त्यांनी उमटवलेला ठसा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सिद्धाली शहा यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेबक अनुप शहा, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अतुल शहा, सिद्धांत शहा, माऊली फाउंडेशनच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.
