प्रतिस्पर्ध्याचा ४७ मतांनी पराभव करत मिळवला दणदणीत विजय; ‘जनसेवा आणि क्लब सक्षमीकरणा’वर देणार भर.
। लोकजागर । फलटण । २६ एप्रिल २०२६ ।
गोवा येथे दि. २४ व २५ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या लायन्स डिस्ट्रीक्ट ३२३४ डी-१ च्या ‘श्री संगम’ प्रांतीय परिषदेमध्ये द्वितीय उपप्रांतपाल पदासाठी झालेल्या निवडणुकीत फलटणचे एमजेएफ लायन मंगेशभाई दोशी यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. मंगेशभाई यांनी एकूण १३० मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ४७ मतांच्या विक्रमी फरकाने पराभव केला.
गोव्यातील कलिंगुट बीचवर पार पडलेल्या या परिषदेमध्ये माजी प्रांतपाल एमजेएफ ला. प्रा. डॉ. राजेंद्र शहा, माजी प्रांतपाल पीएमजेएफ ला. भोजराज नाईक निंबाळकर, स्पॉन्सरिंग कमिटी चेअरमन ला. सुहास निकम, को-ऑर्डिनेटर ला. प्रसन्न कुलकर्णी यांच्यासह फलटणमधील विविध लायन्स क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“हा विजय ग्रासरूट लायन सदस्यांचा” – मंगेशभाई दोशी
विजयानंतर आपली प्रतिक्रिया देताना मंगेशभाई म्हणाले की, “हे यश माझे एकट्याचे नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्रासरूट लायन सदस्याचे आणि माझ्या परिवाराचे आहे. विशेषतः लायन्स क्लब फलटण, गोल्डन, प्लॅटिनम आणि वेलनेस वॉरिअर्सच्या सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळेच हा विजय शक्य झाला.” आगामी काळात केवळ पद भूषवणे हा उद्देश नसून लायनिझमच्या माध्यमातून जनसेवा आणि प्रांतातील सर्व क्लबचे सक्षमीकरण करणे, यावर आपला पूर्ण भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
३९ वर्षांचा सेवाप्रवास आणि अष्टपैलू नेतृत्व:
मंगेशभाई दोशी हे गेल्या ३९ वर्षांपासून लायनिझमच्या माध्यमातून निस्वार्थ सेवा करत आहेत. १९८६ पासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात त्यांनी क्लब प्रेसिडेंट, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी आणि डिस्ट्रिक्ट चीफ अॅडमिनिस्ट्रेटर यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केवळ लायन्सच नव्हे, तर धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय आहेत. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि जैन मंदिराचे ट्रस्टी म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
आगामी कार्यकाळातील संकल्प:
नूतन द्वितीय उपप्रांतपाल म्हणून काम करताना मंगेशभाई यांनी ‘वन डिस्ट्रिक्ट — वन व्हिजन’ ही संकल्पना मांडली आहे. यामध्ये सदस्यांसाठी लीडरशिप वर्कशॉप, महिलांचा सहभाग वाढवणे, कौशल्य विकास, मेगा हेल्थ कॅम्प, नेत्रदान व रक्तदानासाठी डिजिटल प्रणाली आणि ‘ग्रीन डिस्ट्रिक्ट अभियान’ यांसारखे उपक्रम राबविण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.
मंगेशभाई दोशी यांच्या या निवडीबद्दल फलटण शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून आणि लायन्स परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फलटणच्या सेवाभावी संस्कारातून घडलेले हे नेतृत्व आता प्रांतीय स्तरावर आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाले आहे.
