८ ते ११ जून दरम्यान होणार प्रभागनिहाय आरक्षण सोडत; सकाळ आणि दुपार सत्रात निघणार चिठ्ठ्या.
। लोकजागर । फलटण । ४ जून २०२६ ।
फलटण तालुक्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच चालू सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण १०२ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची ही सोडत सोमवार, दिनांक ८ जून ते गुरुवार, दिनांक ११ जून २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वरील चारही दिवशी दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये या विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षणाची सोडत काढली जाईल. यामध्ये ‘सकाळ सत्र’ सकाळी ठीक ११:०० वाजता, तर ‘दुपार सत्र’ दुपारी ठीक ३:०० वाजता सुरू होईल.
चार दिवसांचे महसूल मंडळ व गाव निहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
१. सोमवार, दिनांक ८ जून २०२६ (सकाळ व दुपार सत्र): या पहिल्या दिवशी एकूण २० ग्रामपंचायतींची सोडत होणार आहे. यामध्ये वडजल, ढवळेवाडी (आसू), माझेरी, पिराचीवाडी, नाईकबॉबवाडी, वडगाव, माळेवाडी, दालवडी, सोनवडी खुर्द आणि रावडी खुर्द या गावांची सोडत सकाळच्या सत्रात (सकाळी ११:०० वा.) होईल. तर फडतरवाडी, शेरेशिंदेवाडी, टाकळवाडे, शेरेचीवाडी (ढवळ), निंबळक, बिबी, शिंदेमाळ, मिरेवाडी (दालवडी), सोनवडी बु. आणि रावडी बु. या गावांची सोडत दुपारच्या सत्रात (दुपारी ३:०० वा.) पार पडेल.
२. मंगळवार, दिनांक ९ जून २०२६ (सकाळ व दुपार सत्र): या दिवशी क्रमांक २१ ते ४८ मधील एकूण २८ गावांची सोडत होणार आहे. यामध्ये ढवळेवाडी (निं), आसू, धुळदेव, मिरगाव, मिरढे, कापशी, आरडगाव, तावडी, ठाकुरकी, मुरूम, गोळेवाडी, शिंदेनगर, तिरकवाडी आणि खराडेवाडी या गावांची सोडत सकाळच्या सत्रात होईल. तर निंभोरे, गुणवरे, अलगुडेवाडी, खडकी, जावली, आळजापूर, विठ्ठलवाडी, जोर (कुरवली खुर्द), फरांदवाडी, खामगाव, गोळेगाव, हणमंतवाडी, सासकल आणि डोंबाळवाडी या गावांची आरक्षण सोडत दुपारच्या सत्रात काढली जाईल.
३. बुधवार, दिनांक १० जून २०२६ (सकाळ व दुपार सत्र): या दिवशी क्रमांक ४९ ते ७६ मधील एकूण २८ गावांचा समावेश आहे. खुंटे, साठे, सांगवी, मलवडी, आंदरुड, घाडगेवाडी, कोरेगांव, धुमाळवाडी, झिरपवाडी, होळ, उळुंब, वाघोशी, भाडळी बु. आणि तडवळे या गावांची सोडत सकाळच्या सत्रात होणार आहे. तर शिंदेवाडी, सरडे, सोनगाव, नांदल, कुरवली बु., हिंगणगाव, तांबवे, बोडकेवाडी, जाधववाडी (फ), काळज, जोर (वाखरी), कोहाळे, भाडळी खुर्द आणि टाकोबाईचीवाडी या गावांची प्रक्रिया दुपारच्या सत्रात पूर्ण केली जाईल.
४. गुरुवार, दिनांक ११ जून २०२६ (सकाळ व दुपार सत्र): अंतिम दिवशी क्रमांक ७७ ते १०२ मधील उर्वरित २६ गावांची सोडत होईल. यामध्ये सस्तेवाडी, गोखळी, कांबळेश्वर, वाखरी, राजुरी, शेरेचीवाडी (हिं), कापडगाव, विंचुर्णी, कोळकी, साखरवाडी, जाधववाडी (आसू), काशिदवाडी आणि परहर खुर्द या गावांची सोडत सकाळच्या सत्रात होईल. तर खटकेवस्ती, राजाळे, ढवळ, मुंजवडी, सासवड, तरडगाव, निरगुडी, जिंती, पवारवाडी, भिलकटी, चांभारवाडी, मुळीकवाडी आणि घाडगेमळा या गावांची आरक्षण सोडत दुपारच्या सत्रात पार पडणार आहे.
या आरक्षण सोडतीमुळे कोणत्या प्रभागातून कोणाला निवडणुकीची संधी मिळणार, महिलांचे आरक्षण कुठे पडणार आणि कोणते प्रभाग राखीव होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, विद्यमान सदस्य आणि ग्रामस्थांचे डोळे या निश्चित केलेल्या तारखांकडे आणि ग्रामसभांकडे लागले आहेत. प्रशासनाने संबंधित गावातील नागरिकांना या विशेष ग्रामसभेला वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
