“निसर्गाकडे परत चला” (Back to Nature)

। लोकजागर । ५ जून : जागतिक पर्यावरण दिन विशेष ।

पर्यावरण आणि वातावरण यांचा मानवी जीवन आणि संपूर्ण सजीवसृष्टीशी अतिशय जवळचा आणि अतूट संबंध आहे. या दोन्ही घटकांशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. पृथ्वीवरील प्रत्येक सजीव- मग तो माणूस असो, प्राणी असो की एखादी लहान वनस्पती- या सर्वांचे अस्तित्व पर्यावरण आणि वातावरणाच्या संतुलनावर अवलंबून आहे. आज मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रगतीसाठी पर्यावरण आणि वातावरणाचा समतोल बिघडवला आहे. सजीवसृष्टी आणि मानवाचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्याला पर्यावरण आणि वातावरणाचे रक्षण करावेच लागेल.


दरवर्षी ५ जून रोजी जगभरात ‘जागतिक पर्यावरण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वृक्षारोपण, पर्यावरण रॅली आणि संदेशांचे आदान-प्रदान याद्वारे आपण निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु, आज आपण ज्या पर्यावरणात श्वास घेत आहोत, तिथे एक विरोधाभास पाहायला मिळत आहे.


बदलते ऋतुचक्र (Changing Season Cycle):-भारताची ओळख तीन स्पष्ट ऋतूंसाठी (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) आहे, ज्यावर आपली संपूर्ण शेती आणि जीवन आधारलेले आहे. मात्र, अलिकडच्या काळात जागतिक तापमान वाढीमुळे हे चक्र पूर्णपणे कोलमडले आहे.
भारताची जवळपास 60% पेक्षा जास्त शेती ही मान्सून पावसावर अवलंबून आहे. आता सध्याच्या परिस्थितीत पाऊस वेळेवर येत नाही. कधी प्रचंड दुष्काळ पडतो, तर कधी ढगफुटी होते, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते व महापूर येतो.
मार्च महिन्यापासूनच उष्णतेच्या लाटा (Heat Waves) सुरू होतात आणि तापमान जवळपास 45 ते 48 अंश सेल्सिअस पार जाते. हिवाळ्याचे दिवस कमी झाले आहेत आणि थंडीची तीव्रता अनपेक्षितपणे बदलत चालली आहे.


सजीवांचे व पक्षांचे स्थलांतर (Migration of Wildlife & Birds):- हवामानातील बदलांमुळे प्राणी, पक्षी आणि जलचरांना जगण्यासाठी आपले मूळ स्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. विदेशी पक्षांच्या आगमनात बदल झाला आहे. भारतात दरवर्षी हिवाळ्यात सायबेरिया आणि इतर थंड प्रदेशांतून हजारो मैंलाचा प्रवास करून प्लेमिंगो सारखे परदेशी पक्षी येतात. पण अलीकडे हिवाळा अनिश्चित झाल्यामुळे या पक्षांच्या येण्याच्या वेळेतसुद्धा बदल झाला आहे, तर काहींची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे.
समुद्राचे तापमान वाढल्यामुळे मासे आणि इतर जलचर थंड पाण्याच्या शोधात समुद्राच्या दुसऱ्या भागात स्थलांतर करत आहेत. समुद्री जीवांचे स्थलांतर याचा थेट फटका भारतातील कोळी (मासेमारी) बांधवांना बसु लागला आहे.
यंदाचा पर्यावरण दिन साजरा करताना आपल्याला एका अत्यंत गंभीर आणि दाहक वास्तवाचा सामना करावा लागत आहे, ते वास्तव म्हणजे- ‘अलीकडच्या काळात अनपेक्षितपणे वाढलेले तापमान आणि बदलणारे हवामान’.


जागतिक तापमान वाढ आणि भारत (Global Warming and India):- भारत हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील देशांपैकी एक आहे. तापमान वाढीचे सर्वात घातक परिणाम भारतावर स्पष्टपणे दिसून येत आहेत. हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. यामुळे गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांना सुरुवातीला पूर येण्याचा धोका वाढला आहे आणि भविष्यात या नद्या कोरड्या पडण्याची भीती आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. भारताला सुमारे ७,५१७ कि.मी.ची मोठी किनारपट्टी लाभली आहे. समुद्राची पाणी पातळी वाढल्यामुळे मुंबई, चेन्नई आणि रत्नागिरीसारख्या या किनारपट्टीच्या शहरांना समुद्राचे पाणी शहरात शिरण्याचा आणि जमीन खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे दरवर्षी हातात आलेली पिके (उदा. आंबा, गहू, तांदूळ कापूस, इ.) नष्ट होत आहेत. शेतीच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नुकसानीमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

गेल्या काही वर्षांतील, विशेषतः चालू वर्षातील (२०२६) उन्हाळ्याचा अनुभव पाहिला तर असे जाणवते की, उन्हाळा हा आता केवळ ऋतू उरलेला नाही, तर तो एक प्रकारचे संकट बनत चालला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा-सांगली सारख्या भागातही तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पार जात आहे. एप्रिल-मे महिन्यांत अंगाची होणारी लाही लाही आणि रात्रीच्या वेळी जाणवणारा असह्य उकाडा हा निसर्गाचा आपल्याला मिळणारा थेट इशाराच आहे.

एकीकडे आपण ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देतो, तर दुसरीकडे ‘विकासाच्या’ नावाखाली हजारो-लाखो महाकाय वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल केली जात आहे. उदा. आरे कॉलनी वृक्षतोड, मुंबई (महाराष्ट्र), हसदेव अरण्य जंगलतोड, छत्त्तीसगड, चारधाम महामार्ग प्रकल्प, उत्तराखंड, प्रस्तावित असलेले ग्रेट निकोबार द्वीप प्रकल्प, नाशिक कुंभमेळा व शक्तीपीठ महामार्ग, महाराष्ट्र, इ. मुळे मोठया प्रमाणात त्या ठिकाणी वृक्षतोड होत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे चालू वर्षामध्ये उन्हाळ्याचा पारा ज्या पद्धतीने वाढत गेला आहे, ते पाहता आता ही केवळ हवामान बदलाची चर्चा उरलेली नाही, तर ही आपल्या अस्तित्वाची लढाई बनली आहे.

रस्ते विकासाचा पर्यावरणावर झालेला जीवघेणा परिणाम:-
१. ‘अर्बन हीट आयलंड’ (Urban Heat Island) ची निर्मिती:
रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केल्यामुळे सिमेंट आणि डांबर दिवसा सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती उष्णता वातावरणात सोडतात. पूर्वी रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीमुळे रस्ते तापत नव्हते. आता झाडे नसल्याने हे रस्ते उन्हाळ्यात ‘तव्यासारखे’ तापतात, ज्यामुळे स्थानिक तापमानात ३ ते ५ अंशांची थेट वाढ झाली आहे. उदा. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू ही प्रमुख शहरे.
२. जमिनीची धूप आणि भूगर्भातील पाण्याची पातळी घटणे:
झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यास व जमिनीची धूप रोखण्यास मदत करतात. परंतु, अलीकडे यामध्ये बदल होत आहे. उदा. महाराष्ट्रातील घाटमाथा, कोकण किनारपट्टी, चंबळचे खोरे, मध्य प्रदेश.
महामार्गांच्या कडेची झाडे नष्ट झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वेगाने वाहून जाते. परिणामी, शेजारील शेतांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी (Water Table) कमालीची खालावली आहे. उदा. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रातील मराठवाडा, पुणे, मुंबई, बेंगळुरू सारखी शहरे.
३. पक्ष्यांचे आणि वन्यजीवांचे आश्रयस्थान नष्ट:
रस्त्याच्या कडेची जुनी झाडे हा लाखो पक्षी, कीटक आणि खारींसारख्या लहान प्राण्यांचा आसरा असतो. ही झाडे तोडल्यामुळे अनेक दुर्मिळ पक्षी व प्राणी शहरांतून आणि गावांमधून कायमचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, ज्यामुळे निसर्गाची अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे. उदा. एकशिंगी गेंडा, आसाम, हत्तींचे कॉरिडॉर नष्ट होणे- हसदेव अरण्य, छत्त्तीसगड, शेकरू- भीमाशंकर, प्लेमिंगो पक्षी- नवी मुंबई (महाराष्ट्र), माळढोक- सोलापूर, इ.
४. प्रदूषणात प्रचंड वाढ:
महामार्गांवरून धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा विषारी धूर (कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड) शोषून घेण्याचे काम ही झाडे करायची. आता झाडेच नसल्याने हा विषारी धूर थेट आपल्या फुफ्फुसात जात आहे, ज्यामुळे श्वसनाचे गंभीर आजार वाढले आहेत.
उदा. दिल्ली, मुंबई, पुणे सारखी मोठी शहरे प्रदूषणाची केंद्रे बनत चालली आहेत.
५. कागदोपत्री वृक्षारोपणाचा फार्स:
कायद्यानुसार एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात ५ ते १० झाडे लावणे बंधनकारक असते. परंतु, बऱ्याचदा महामार्गाच्या कडेला केवळ शोभेची किंवा विदेशी झाडे (उदा. गुलमोहर, सुबाभूळ) लावली जातात, जी स्थानिक पर्यावरणाला पूरक नसतात. अनेक ठिकाणी लावलेली रोपटी देखभालीअभावी उन्हाळ्यात वाळून जातात. हा कागदोपत्री कारभार पृथ्वीची धग कमी करू शकत नाही तर वाढवत चालला आहे.
निसर्गाविषयीचे तत्त्वज्ञान:-
जीन-जॅक रुसो (Jean-Jacques Rousseau) हे १८ व्या शतकातील फ्रान्सचे एक महान विचारवंत आणि तत्त्वज्ञ होते. आधुनिक जगात निसर्गाकडे परत जाण्याचा (Return to Nature) संदेश देणारे ते पहिले प्रमुख विचारवंत मानले जातात. रुसो यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान एका मुख्य वाक्यावर आधारलेले आहे- “ईश्वराच्या किंवा निसर्गाच्या घरातून जेव्हा कोणतीही गोष्ट बाहेर पडते, तेव्हा ती अत्यंत शुद्ध आणि चांगली असते; परंतु माणसाच्या हातात पडताच ती दूषित आणि विकृत होते.” रुसो यांच्या मते निसर्ग ही केवळ एक निर्जीव वस्तू किंवा उपभोग घेण्याची गोष्ट नाही, तर निसर्ग हा मानवाचा सर्वात मोठा शिक्षक, रक्षक आणि मार्गदर्शक आहे. आज आपण ज्या ‘शाश्वत विकास’ किंवा पर्यावरण रक्षणाच्या गप्पा मारतो, त्याची पाळेमुळे रुसो यांच्या “निसर्गाकडे परत चला” या विचारात दडलेली आहेत.
‘शाश्वत विकास’ (Sustainable Development) हाच एकमेव पर्याय:-
शाश्वत विकास (Sustainable Development) ही संकल्पना आधुनिक जगात जरी १९८७ च्या ‘ब्रंडलँड रिपोर्ट’ नंतर प्रसिद्ध झाली असली, तरी तिचे मूळ विचार महात्मा गांधींनी जवळपास १०० वर्षांपूर्वीच मांडले होते. त्यांच्या मते, “या पृथ्वीवर प्रत्येकाची ‘गरज’ पूर्ण करण्यासाठी पुरेसे स्त्रोत उपलब्ध आहेत, पण कोणाचीही ‘हाव’ (लोभ) पूर्ण करण्यासाठी नाही.” (Earth provides enough to satisfy every man’s needs, but not every man’s greed.) या व्याख्येचा अर्थ असा की, निसर्गाकडे आपल्याला जगवण्यासाठी भरभरून देण्याची क्षमता आहे. जोपर्यंत माणूस आपल्या गरजेपुरता निसर्गाचा वापर करतो, तोपर्यंत निसर्गाचा समतोल बिघडत नाही. पण जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आणि लोभासाठी निसर्गाचे शोषण करू लागतो (उदा. अमर्याद खाणकाम, जंगलतोड, भूभाग सपाटीकरण), तेव्हा शाश्वततेचा पाया ढासळतो.
आपल्याला रस्तेही हवेत आणि पर्यावरणही हवे आहे. यासाठी आता प्रशासनाने आणि समाजाने आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे.

१. झाडे वाचवून रस्ते तयार करणे:
जिथे शक्य असेल तिथे रस्त्यांचे नकाशे थोडे बदलून जुनी आणि ऐतिहासिक झाडे वाचवली पाहिजेत. परदेशांप्रमाणेच ‘ट्री ट्रान्सप्लांटेशन’ (झाड मुळासकट काढून दुसरीकडे जिवंत लावणे) या तंत्रज्ञानाचा सगळीकडे प्रभावी वापर झाला पाहिजे.

२. मियाँवाकी (Miyawaki) जंगलांची निर्मिती:
मियावाकी (Miyawaki) ही अतिशय कमी जागेत आणि कमी वेळेत घनदाट नैसर्गिक जंगल तयार करण्याची एक आधुनिक जपानी पद्धत आहे. या पद्धतीचा शोध जपानचे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी (Dr. Akira Miyawaki) यांनी लावला होता. पारंपारिक पद्धतीने जंगल वाढायला जिथे १०० वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो, तिथे मियावाकी पद्धतीने अवघ्या १० ते १५ वर्षांत स्वावलंबी आणि घनदाट जंगल तयार करता येते.
आजकाल भारतातील प्रमुख शहरांमध्ये (उदा. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, इ. ठिकाणी) ‘अर्बन हिट आयलंड’चा प्रभाव कमी करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. महामार्गाच्या कडेला तसेच मोकळ्या असलेल्या शासकीय जमिनींवर सुद्धा दाट स्थानिक वृक्षांची जंगले उभी केली पाहिजेत.

३. केवळ वृक्षारोपण नाही, तर ‘वृक्षसंगोपन’:
“झाडे लावणे हे केवळ एक ‘काम’ आहे, पण झाडे जगवणे ही एक ‘संस्कृती’ आहे.” हजारो झाडे लावून ती वाळून देण्यापेक्षा, फक्त ५ झाडे लावावीत पण ती पूर्णपणे मोठी होईपर्यंत जगवावीत, हाच ‘वृक्ष संगोपन’ चा मुख्य गाभा आहे. जेव्हा आपण लावलेले रोपटे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले पर्यावरण संवर्धन यशस्वी होते.
लावलेले झाड हे किमान ३ ते ५ वर्षे जगवण्याची कायदेशीर जबाबदारी कंत्राटदार आणि स्थानिक प्रशासनावर निश्चित केली गेली पाहिजे.
शेवटी, निसर्ग आपल्याला भरभरून देतो, पण जेव्हा त्याचा अंत पाहिला जातो, तेव्हा तो तापमानाच्या रूपाने आपला कोप दाखवतो. जर आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा असाच बळी देत गेलो, तर येणारा काळ मानवी जीवनासाठी असह्य असेल. सिमेंटच्या रस्त्यांवरून वेगाने धावताना आपण विनाशाच्या दरीकडे तर जात नाही ना, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
चला, या पर्यावरण दिनी रस्ते रुंद होणार नाहीत, तर पृथ्वीचे ‘हरित कवच’ देखील रुंद होईल, यासाठी आग्रही राहूया! आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण केवळ घोषणा न देता, कृतीची शपथ घेतली पाहिजे. जर आपण आज निसर्गाचे रक्षण केले, तरच निसर्ग उद्या आपल्या पुढील पिढीचे रक्षण करेल.

– डॉ. आशिष शिवराम जाधव, भूगोल विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण.

Spread the love