बापूसाहेब मोदी यांचे दुःखद निधन

३४ वर्षे आदर्श शिक्षक म्हणून सेवा; ग्राहक चळवळ, ज्येष्ठ नागरिक संघ आणि साहित्य परिषदेत बजावले मोलाचे योगदान

। लोकजागर वृत्त । फलटण । २३ जून २०२६ ।

फलटण तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व बापूसाहेब मोतीभाई मोदी यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी सकाळी दहा वाजता फलटण येथील (मलठण) दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बापूसाहेब मोदी यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३७ रोजी कराड तालुक्यातील (तत्कालीन उत्तर सातारा) कोळेवाडी येथे झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोळेवाडी येथील मराठी शाळेत, तर उर्वरित प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साखरवाडी विद्यालयात झाले. त्यांनी आपले उच्च शिक्षण कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज (इंटर आर्ट्सपर्यंत) आणि फलटणच्या मुधोजी महाविद्यालयातून (पदवीपर्यंत) पूर्ण केले. त्यानंतर सातारा येथील आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून बी.एड. आणि बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून बहिःस्थ विद्यार्थी म्हणून एम.ए. ची पदवी संपादन केली. त्यांनी मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या विषयांवर उत्तम प्रभुत्व मिळवले होते.

त्यांचा शिक्षक म्हणून सेवा कालखंड अत्यंत गौरवशाली राहिला. त्यांनी १९६१ ते १९६८ या काळात रयत शिक्षण संस्थेत आणि त्यानंतर १९६८ ते १९९५ या प्रदीर्घ काळात इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती हायस्कूलमध्ये अविरत सेवा केली. ३१ ऑक्टोबर १९९५ रोजी ३४ वर्षांच्या प्रदीर्घ आणि आदर्श शिक्षक सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले होते. वाचन, व्याख्याने देणे व ऐकणे आणि सामाजिक कार्य ही त्यांची मुख्य आवड होती. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने त्यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला आणि फलटण तालुक्यातील सर्व शाळांमधून ‘ग्राहक संरक्षण कायदा’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्याने देऊन मोठी जागृती घडवून आणली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची ‘ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती’वर सदस्य म्हणून निवड झाली होती.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात पूर्णपणे झोकून दिले होते. त्यांनी फलटण येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष म्हणून, तर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटणचे कोषाध्यक्ष म्हणून उत्तम जबाबदारी सांभाळली. ते श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य म्हणून आजतागायत सक्रियपणे कार्यरत होते. यासोबतच मुस्लिम समाजोन्नती प्रतिष्ठान, फलटणचे संस्थापक सदस्य म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. बापूसाहेब मोदी यांच्या निधनाने फलटण परिसराने एक बहुआयामी, अभ्यासू आणि मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे.

Spread the love