जागतिक अवयवदान दिनानिमित्त फलटणमध्ये विशेष जनजागृती; केमिस्ट असोसिएशनच्या पुढाकाराने पोस्टर अनावरण!

विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य; अवयवदानाचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प.

। लोकजागर वृत्त । फलटण । १३ ऑगस्ट २०२६ ।

१३ ऑगस्ट ‘जागतिक अवयवदान दिना’चे औचित्य साधून फलटण प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे अवयवदानाविषयी व्यापक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनच्या पुढाकाराने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे ज्येष्ठ सभासद व मार्गदर्शक विजय जाधव यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार अभिजित जाधव यांच्या हस्ते जनजागृतीपर विशेष पोस्टर्सचे अनावरण घडवून आणत अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय येथे फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संग्रामसिंह धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टर अनावरण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक लिला मदने, वैद्यकीय अधिकारी भोसले, इनचार्ज सिस्टर लाळगे, असिस्टंट सिस्टर शकुंतला शेंडगे कुलकर्णी, प्रयोगशाळा सहाय्यक गुजवटे, आरोग्य सेवक निलेश सोनवलकर यांच्यासह फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देत या महादानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Spread the love