माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठकांचा धडाका.
। लोकजागर वृत्त । फलटण । १३ ऑगस्ट २०२६ ।
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्यांचा वर्षानुवर्षांचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सुमारे ८०० वाहिवाटीचे रस्ते प्राधान्याने विकसित करण्याचे कडक निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले आहेत. पंचायत समिती सभागृहात आयोजित विविध तालुकास्तरीय समित्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
आमदार सचिन पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यातून ‘मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजने’अंतर्गत तालुक्यातील ५७ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर पानंद रस्त्यांची कामे वेळेत, अत्यंत उच्च दर्जाची आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. याच बैठकीत शासकीय जागांवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणाचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. अनेक गावांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ग्रामसेवक, तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव दाखल करावेत, असे बजावले. युती शासन बेघर कुटुंबांना हक्काची जागा आणि घरकूल देण्यासाठी कटिबद्ध असून, या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, औषधसाठा आणि २४ तास तत्पर वैद्यकीय सेवांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील गरोदर महिलांची तपासणी, साथीचे रोग नियंत्रण, कर्करोग निर्मूलन आणि रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. रुग्णांच्या सेवेत कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत सर्व उपस्थितांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली.
दरम्यान, तालुकास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्हे आणि दलित वस्ती विकासाच्या निधीवर सविस्तर चर्चा झाली. दलित वस्ती विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच फलटण नगरपालिकेच्या सभागृहाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल दक्षता समितीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचवून फलटण तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा निर्धार या वेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण बैठकांना प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, गटविकास अधिकारी अक्षय घावटे, तालुका आरोग्य अधिकारी कोंडके, पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
