माहिती तंत्रज्ञानाच्या युगात AI प्रशिक्षणाची नितांत गरज : डॉ. सचिन सूर्यवंशी

श्रीराम एज्युकेशन सोसायटीमध्ये कै. सुभाषराव सूर्यवंशी (काका) यांचा तृतीय स्मृतिदिन संपन्न; गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त गुरुजनांचा गौरव

। लोकजागर वृत्त । फलटण । २१ ऑगस्ट २०२६ ।

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज AI प्रशिक्षणाची नितांत गरज आहे आणि या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सज्ज ठेवले पाहिजे; प्रत्येक विद्यार्थ्याचा सत्कार करण्याची संधी आम्हास मिळावी, असे आवाहन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी केले. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय आणि सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांचा तृतीय स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वेळी आपल्या मनोगतातून काकांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत त्यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली, तसेच विविध क्रीडा व इतर स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रथमत: श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष सी. एल. पवार, मानद सचिव सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), सदस्या ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके), सदस्य प्रकाश तारळकर, माजी प्राचार्य आप्पा शिंदे यांच्या हस्ते कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अलौकिक यशात योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त गुरुजनांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. “संस्थेने आमच्या कार्याची दखल घेऊन केलेला सत्कार अविस्मरणीय असून आम्ही सदैव ऋणात राहू,” असे उद्गार सेवानिवृत्त शिक्षकांनी काढले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा, बी.ए. भाग ३, बी.कॉम. भाग ३, डी फार्मसी कॉलेज आणि माध्यमिक स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच १८ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जयंती व स्मृतिदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला आणि क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यादव एस.डी. यांनी केले. नियोजन प्राचार्या गायकवाड एन.एम., उपप्राचार्य घनवट पी.डी. व सर्व विभाग प्रमुखांनी केले, तर फलक लेखन कला शिक्षिका ढेंबरे डी.पी. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादव एस.डी., तगारे एस. एम. व माने डी.आर. यांनी केले, तर आभार पवार एस. आर. यांनी मानले. या प्रसंगी सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Spread the love