फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत कौशल्याधारित प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; स्थानिक पातळीवर मिळणार रोजगाराची संधी!

‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज’, ‘यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क’ व ‘नवयान संस्थे’चा संयुक्त उपक्रम.

। लोकजागर वृत्त । फलटण । २२ ऑगस्ट २०२६ ।

फलटण तालुक्यातील १८ ते ३५ वयोगटातील महिला, मुली व युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज (CYDA), पुणे, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, सातारा आणि नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था, बरड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत इच्छुक महिला व युवकांना त्यांच्या आवडीच्या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रमाचे पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण शक्यतो सहभागींच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर सहभागी उमेदवारांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न व सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्यांच्याच परिसरात रोजगार मिळविण्यासाठी मार्गदर्शन करून रोजगार दिला जाईल.

तसेच, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक पात्र सहभागीला संबंधित अभ्यासक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र (Certificate) देण्यात येणार आहे, ज्यामुळे पुढील रोजगाराच्या संधी मिळविण्यास मदत होईल. याबरोबरच इच्छुक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • पूर्णपणे मोफत प्रशिक्षण (कोणतेही शुल्क नाही)
  • आपल्याच परिसरात प्रशिक्षणाची सुविधा
  • कोर्स पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र
  • प्रशिक्षणानंतर स्थानिक पातळीवर व सातारा जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी
  • चांगल्या पगाराची नोकरी व स्वाभिमानाने काम करण्याची संधी
  • स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक महिलांना विशेष मार्गदर्शन

आजच्या काळात कौशल्य विकासाला मोठे महत्त्व असून महिला व युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १८ ते ३५ वयोगटातील इच्छुक महिला, मुली व युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आजच नावनोंदणी करावी, मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र मिळवून स्थानिक पातळीवर रोजगारासाठी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था, बरड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क:

हनुमंत भानुदास लोंढे

नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था, बरड

मोबाईल क्रमांक: ९११२३४९७९७

Spread the love