९ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक; ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत.
। लोकजागर । मुंबई । २४ एप्रिल २०२६ ।
महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या नऊ जागांचा कार्यकाळ संपत असल्याने आणि एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या एकूण १० जागांसाठी मंगळवार, १२ मे २०२६ रोजी मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
या सदस्यांचा कार्यकाळ संपणार: विधान परिषदेचे विद्यमान सदस्य संजय केणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या नऊ सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक होत आहे. याशिवाय, डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. डॉ. सातव यांच्या या जागेची मूळ मुदत २७ जुलै २०३० पर्यंत होती.
निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक:
- अधिसूचना प्रसिद्ध होणे: गुरुवार, २३ एप्रिल २०२६
- नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख: गुरुवार, ३० एप्रिल २०२६
- अर्जांची छाननी: शनिवार, २ मे २०२६
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत: सोमवार, ४ मे २०२६
- मतदानाचा दिनांक: मंगळवार, १२ मे २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४)
- मतमोजणी: मंगळवार, १२ मे २०२६ (सायंकाळी ५ वाजल्यापासून)
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १३ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आयोगाने केले आहे. राज्यातील राजकीय समीकरणे पाहता, या १० जागांसाठी होणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळानुसार विविध पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार आणि कोणत्या नेत्यांना संधी मिळणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
