शिवसेनेच्या रेश्माताई भोसले यांच्या आरोपांना घणाघाती पलटवार; विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला
। लोकजागर वृत्त । फलटण । २३ ऑगस्ट २०२६ ।
परस्त्री मातेसमान हीच आमच्या नेत्याची शिकवण आहे. त्यांनी आरोप केलेल्या सर्व प्रकरणात माझ्या नेत्याला क्लीन चिट मिळाली आहे. माझ्या नेत्याचे एकाही महिलेसोबत जोडलेले नाव दाखवून द्या, मी गजानन चौकात जाहीर फाशी घेईन, असा थेट इशारा फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिला.
श्रीराम कारखान्यासंबंधीच्या बैठकीत साखरवाडी येथे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी पंचायत समिती सभापतींना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच भाजप व राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविकांनी निषेध केला होता. याला प्रतिउत्तर देताना शिवसेना सातारा जिल्हा महिला प्रमुख सौ.रेश्माताई भोसले यांनी रामराजेंच्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. हा आरोप करताना भोसले यांनी जुन्या प्रकरणांवर बोट ठेवत टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अनुप शहा बोलत होते.
अनुप शहा पुढे म्हणाले, “रामराजे आपल्या भाषणात तालुक्यातील मुद्द्यांवर बोलले असते तर बरे झाले असते. ते वारंवार माझ्या नेत्याच्या कारखान्यावर बोलत आहेत, पण माझ्या नेत्याने आपला कारखाना स्वतःच्या हिमतीवर सुरू केला आहे. बोलताना आपण मर्यादा बाळगावी; आम्ही आमची मर्यादा बाळगून आहोत. आम्ही कुठलीही गुंडगिरी केलेली नाही.” अशा शब्दात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पाठराखण करत अनुप शहा यांनी, “आपल्यापासून तालुक्यातील जनता का दूर गेली, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा सल्लाही विरोधकांना दिला.
