नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्यातून सामाजिक उपक्रम; शेकडो वारकऱ्यांनी घेतला सुविधेचा लाभ

। लोकजागर वृत्त । फलटण । १८ जुलै २०२६ ।

जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण शहरात आगमन असता, या सोहळ्यानिमित्त शहरात आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि तरुण मंडळे वारकरी सेवेसाठी अग्रेसर असतात. याच भावनेतून शहरातील युवा कार्यकर्ते अभिषेक धनंजय निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि लाडूचे मोफत वाटप केले. वारीच्या निमित्ताने शहरात आलेल्या लाखो भाविकांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशाने या विशेष अन्न आणि पाणी बहुउद्देशीय सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक सेवेचा लाभ मार्गावरून जाणाऱ्या शेकडो वारकरी भाविकांनी अत्यंत समाधानाने घेतला.

या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना अभिषेक निंबाळकर यांनी सांगितले की, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्याची तीव्र इच्छा आम्ही नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे बोलून दाखवली होती. आमच्या या सामाजिक भावनेला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्षांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स आणि मोठ्या प्रमाणावर लाडू उपलब्ध करून दिले. या मोलाच्या सहकार्यानंतर शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही ही सेवा बजावली. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारीच्या काळात वारकऱ्यांची सेवा करण्याची ही उत्तम संधी लाभल्याबद्दल अभिषेक निंबाळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नगराध्यक्षांचे विशेष आभार मानले आहेत.

Spread the love