फलटणच्या श्रीराम मंदिरात सामूहिक मारुती स्तोत्र व रामरक्षा पठण उत्साहात; भाविकांचा मोठा सहभाग!

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहाय्यक संस्थेचा उपक्रम; भक्तीमय वातावरणात महाआरतीने सांगता.

। लोकजागर वृत्त । फलटण । २५ ऑगस्ट २०२६ ।

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहाय्यक संस्था नाशिक, केंद्र फलटण यांच्यातर्फे श्रावण मासानिमित्त सामूहिक मारुती स्तोत्र व रामरक्षा पठण मोठ्या उत्साहात पार पडले.

श्रीराम मंदिर, फलटण येथे पार पडलेल्या या पठण कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग होता, तसेच ज्येष्ठ व लहान मुलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. प्रारंभी श्रीराम व हनुमान यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते वंदन करण्यात आले.

मंचावर पुष्पाताई कदम, हेमलता गुळवणी, माधुरी दाणी व शिवानी चिटणीस यांनी पठणाविषयी माहिती देऊन भक्तीमय वातावरणात कार्यक्रम पार पाडला.

या वेळी फलटण केंद्रप्रमुख चंद्रशेखर दाणी यांनी नाशिक येथील कार्यकारिणी प्रमुख साठे, उपाध्यक्ष प्रविण कुलकर्णी, पाडेकर गुरुजी, समीर जोशी, पारनेरकर यांसह लोणंदचे प्रकाश देशपांडे, नीरा केंद्राचे बडबडे, जयश्री जोशी आणि अनुराधा आळतेकर यांचा सत्कार केला.

त्यानंतर अवधुत गुळवणी व हेमलता गुळवणी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सचिन कुलकर्णी, निखिल केसकर, वैभव विष्णूप्रद यांच्यासह सर्व सभासद व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love