आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे तीव्र निषेध; महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांचा हल्लाबोल

। लोकजागर वृत्त । फलटण । ६ ऑगस्ट २०२६ ।

काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी जे वक्तव्य केलेले आहे, त्या वक्तव्याचा मी निषेध करतो. वास्तविक पाहता फलटणसारख्या राजकीयदृष्ट्या जागृत मतदारसंघाचे राज्याच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार महोदयांनी प्रथम याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली असती तर बरे झाले असते. हे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले नसून काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील पोस्ट आहे, ही साधी बाब आमदार महोदयांना माहीत नसावी याचेच आश्चर्य वाटते, असा टोला फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी लगावला आहे.

खरे तर ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात किंवा ज्यांच्यामुळे ते आमदार झाले त्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची किंबहुना घातपाताची चौकशीची साधी मागणीही अद्याप त्यांनी केलेली नाही. याबाबत विधानसभेच्या पटलावरती त्यांनी ही मागणी करायला हवी होती; पण ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत की भाजपचे कार्यकर्ते आहेत याबाबत त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान सूर्यवंशी यांनी दिले. फलटण शहर व तालुक्यात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आमदार झाल्यानंतर जी काही आश्वासने दिली होती ती त्यांनी आठवावीत आणि त्याची पूर्तता का होऊ शकत नाही याचे आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले.

शहरातून सुरू असलेले पालखी महामार्गाचे काम व त्याचा दर्जा याची उत्तम प्रचिती नुकत्याच झालेल्या विजेचे खांब पडण्याच्या घटनेतून आलेली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची साधी विचारपूसही त्यांनी केल्याचे दिसून आले नाही. तसेच शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून शेतकरी, बेरोजगार युवक यांच्या बाबतीत वेगवेगळे विषय आहेत, त्याकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष द्यावे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित वक्तव्य करून आपला राजकीय बालिशपणा तालुक्याला दाखवून देऊ नये. पुन्हा एकदा त्यांच्या या वक्तव्याचा व कृतीचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मी निषेध करतो, असे पत्रकाद्वारे महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी स्पष्ट केले.

Spread the love