कारखाने बंद पाडून खाजगी कारखान्यांची सोय करण्याचे सरकारचे धोरण आहे का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा थेट सवाल.
। लोकजागर वृत्त । फलटण । २५ ऑगस्ट २०२६ ।
फलटणमध्ये ऊस वाढायला लागला आहे आणि इथल्या कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. विशेषतः साखरवाडी कारखान्याने १५ हजार टन क्षमता केली असल्यामुळे श्रीराम कारखाना बंद पडावा असे शेजारच्या दोन कारखान्यांना वाटते, कारण त्याशिवाय त्यांना ऊस उपलब्ध होणार नाही. परंतु सहकारातला हा कारखाना आहे आणि तो शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे यासाठी सभासदांनी प्रयत्न करायला पाहिजेत. सरकारचा खरं तर हा कारखाना चालू राहायला पाहिजे असा प्रयत्न असायला हवा होता. मुख्यमंत्रीच श्रीराम कारखाना बंद पडावा यासाठी प्रयत्न करत आहेत असे मी ऐकले आहे. कारखाने बंद पाडायचे आणि खाजगी कारखान्यांची सोय करायची असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असा घणाघाती हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्रीराम कारखाना चालू करायला भाग पाडतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमरसिंह कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रवक्ता प्रमोद गाडे, शहराध्यक्ष विक्रम पवार, किरण भोसले, जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, संघटक बाळासाहेब शिपुकले, दादासाहेब शेडगे यांच्यासह सभासद उपस्थित होते.
साखर घोटाळ्यावरून केंद्र सरकारवर निशाणा:
फलटणच्या शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले, “पुढचे वर्ष साखर उद्योगासाठी चांगले असेल. पुढच्या वर्षीसुद्धा देशाला जेमतेम पुरेल एवढेच साखरेचे उत्पादन होईल. इथेनॉल खरेदीच्या किमती जर वाढवल्या नाहीत तर साखरेचे उत्पादन वाढू शकते. उसाचे उत्पादन वाढले असताना ब्राझीलने देखील इथेनॉलच्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा साखरेच्या किमती चढ्या राहतील. अशा परिस्थितीत आपल्या उसाच्या पै-पैचा हिशोब घेतला पाहिजे.”
दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असली, तरी शेजारच्या बांगलादेश, नेपाळ या देशांमध्ये रस्त्याच्या मार्गाने चोरून साखर गेल्याचा आरोप त्यांनी केला. “४५ लाख टन साखर बाहेर गेली आहे असे जर ग्राह्य धरले तर साधारण ३ लाख ट्रक बाहेर गेले असावेत. एवढे ट्रक बाहेर जात असताना केंद्र सरकारचे गृह खाते काय करत होते? याचे उत्तर गृहमंत्री अमित शहा व अन्न-धान्य मंत्री जोशी यांनी द्यावे,” असे ते म्हणाले. संपूर्ण देशात ३५ लाख टन साखर शिल्लक असल्याचे सरकार सांगते, त्यातील २५ लाख टन साखर एकट्या महाराष्ट्रात आहे; मग इतर राज्यातील साखर कुठे गेली? या २२ ते २३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असा आरोप त्यांनी केला.
दूध दरावर संयमाचे आवाहन:
दूध दराच्या प्रश्नावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, प्रशासनाच्या कारवाईमुळे निकृष्ट दर्जाचे दूध कमी झाले असून दर्जेदार दूध उत्पादन मिळत आहे. दूध संस्थांनी संयमाने दुधाचे दर वाढवावेत. अनिष्ट स्पर्धेतून दुधाचे दर वाढले तर त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर आणि खपावर होईल, हे गणित डोळ्यांसमोर ठेवणे गरजेचे आहे.
‘गाव तिथे शाखा’ उभारून आंदोलन छेडणार:
पत्रकार परिषदेपूर्वी फलटण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांची थकीत एफ.आर.पी., प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता, श्रीराम साखर कारखाना पूर्ववत सुरू करणे, नियमित कर्जदारांना दोन लाखांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देणे आणि अतिवृष्टीतील प्रलंबित नुकसान भरपाई या विविध विषयांवर चर्चा झाली. फलटण तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ स्थापन करून शेतकरी आंदोलनास बळकटी देण्याचा निर्धार या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
