खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; विवेक सावंत आणि काकासाहेब देशमुख करणार मार्गदर्शन.
। लोकजागर वृत्त । फलटण । ८ सप्टेंबर २०२६ ।
प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी निमित्त तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून फलटण नगर परिषद यांच्या वतीने शैक्षणिक प्रबोधन मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे असणार आहेत, अशी माहिती फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष तथा शिक्षण क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती प्रियदर्शनी भोसले यांनी दिली.
मेळाव्याबाबत सविस्तर माहिती देताना उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले यांनी सांगितले की, मेळावा उद्घाटनावेळी फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी बेडके, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखील जाधव, नगरसेवक यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मेळाव्यात “आधुनिक शिक्षण पद्धती आणि शिक्षकांची भूमिका” या विषयावर एमकेसीएलचे संचालक व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच “बदलत चाललेली शिक्षण व्यवस्था व शिक्षकांची बांधिलकी” या विषयावर शिवम परिवाराचे प्रमुख व प्रसिद्ध वक्ते इंद्रजीत तथा काकासाहेब देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षकवर्ग तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांनी या शैक्षणिक प्रबोधन मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले यांनी केले आहे. या मेळाव्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग, फलटण नगर परिषद शिक्षण समिती, महाराजा व सद्गुरू उद्योग समूह, श्रीराम एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
