पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कृषी अधिकाऱ्यांना सक्त निर्देश; वाठार निंबाळकर, भाडळी आणि दुधेबावी परिसरातील दुष्काळी परिस्थितीची केली पाहणी.
। लोकजागर वृत्त । फलटण । २४ सप्टेंबर २०२६ ।
बांधावर जाऊन स्थळ पाहणी करण्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. केवळ गुगल, इंटरनेट किंवा ड्रोन सर्व्हेवर अवलंबून न राहता बांधावर गेल्याशिवाय तिथली परिस्थिती लक्षात येत नाही, त्यामुळे वस्तुस्थितीनिष्ठ पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहवाल पाठवा अशा सक्त सूचना मी दिलेल्या आहेत, असे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर, भाडळी, दुधेबावी परिसरातील दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा पालकमंत्री देसाई यांनी केला. त्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. या दौऱ्याप्रसंगी देसाई यांच्या समवेत माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देसाई पुढे म्हणाले की, शून्य उतारा पिकाचा निघेल इतकी भयानक परिस्थिती अनेक क्षेत्रात निर्माण झाली आहे. घेवडा व बाजरीची परिस्थिती अत्यंत बिकट असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. निसर्गाची अवकृपा झाली असून गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला या प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश दिले आहेत. या पाहणीनंतर नुकसानीचा सविस्तर आढावा येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहोत. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि जनावरांचा चारा अशा सगळ्याच प्रश्नांचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत मांडून सरकार या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील व त्यांना या संकटातून नक्की बाहेर काढेल असे त्यांनी आश्वस्त केले.
पुढे बोलताना देसाई यांनी सांगितले की, घेवडा पिकाचा पीक विम्यामध्ये समावेश करण्याचा पाठीमागे प्रयत्न केला होता, परंतु तो यशस्वी झाला नाही. आता येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व आमदारांशी चर्चा करून जिल्ह्यामार्फत याचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल.
