जमीन मोजणी कराल तर दांडक्यानं समाचार घेणार; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरचे शेतकरी पेटून उठले!

राजू शेट्टींचा प्रशासनाला थेट इशारा; हसूर दुमाला येथे ऊसाचे दांडके व चाबूक घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरल्याने मोजणी रद्द.

। लोकजागर वृत्त । हसूर दुमाला / कोल्हापूर । ११ सप्टेंबर २०२६ ।

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजा आता आरपारच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरला आहे. जर प्रशासकीय अधिकारी जबरदस्तीने जमिनीची मोजणी करण्यासाठी आले, तर शेतकरी त्यांना चोप दिल्याशिवाय सोडणार नाहीत आणि दांडक्याने त्यांचा समाचार घेतला जाईल, असा आक्रमक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी हसूर दुमाला येथे आज होणाऱ्या नियोजित संयुक्त मोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहून या मोजणीस कडाडून विरोध करत प्रशासनाला दिला आहे.

आज कोल्हापूर जिल्ह्यातील हसूर दुमाला गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत वज्रमुठ करून संयुक्त मोजणीस कडाडून विरोध केला. जमिनीची संयुक्त मोजणी कायदेशीर मार्गाने असो की पोलिसांच्या बळावर, ती कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही, असा सज्जड दम शेतकऱ्यांनी दिला आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासूनच हसूर दुमाला गावातील शेतकरी ऊसाचे दांडके व चाबूक घेऊन गावात उभे राहिले होते. यामुळे प्रशासनाने आज नियोजित संयुक्त मोजणीचा निर्णय रद्द केला. शक्तीपीठ महामार्गासाठी सुपीक जमिनी संपादित केल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आपल्या हक्काच्या जमिनी गेल्या तर शेतकऱ्यांनी काय खायचे, असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये या महामार्गाच्या संयुक्त मोजणीला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला असून, कोणत्याही परिस्थितीत अधिकारी पाऊल ठेवू शकणार नाहीत, अशी तटबंदी शेतकऱ्यांनी उभारली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा शेतकरी रोष पाहता, आता राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गाबाबत नमती भूमिका घेणार की शेतकऱ्यांचा हा संघर्ष आणखी उग्र रूप धारण करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या वेळी आमदार संपतबापू पाटील, गिरीश फोंडे, शिवसेना संपर्कप्रमुख विजय देवणे, सम्राट मोरे, शेकापचे जिल्हा परिषद सदस्य बाबासो देवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांच्यासह हसूर दुमाला गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love