कर्मवीरांचे कार्य माणसे पेरणारे; धुळदेव येथील जयंती सोहळ्यात प्राचार्य रवींद्र येवले यांचे प्रतिपादन

धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात १३९ वा कर्मवीर जयंती समारंभ उत्साहात; गुणवंत विद्यार्थी व देणगीदारांचा सत्कार.

। लोकजागर वृत्त । फलटण । २६ सप्टेंबर २०२६ ।

धुळदेव येथील धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात १३९ व्या कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्राचार्य रवींद्र येवले यांनी कर्मवीरांचे कार्य माणसे पेरणारे असल्याचे स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, कर्मवीरांचा त्याग, साधी राहणी आणि शिक्षणाप्रती असणारी तळमळ यातून लाखो विद्यार्थी तयार झाले आहेत. हास्य हे जीवनाला निर्मळ बनवते, त्यामुळे प्रत्येकाने आयुष्य हे सकारात्मकतेने जगले पाहिजे असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर देणगीदार विनय गांधी होते. यावेळी प्राचार्य दत्तात्रय भिवरकर यांनी शाखेच्या भौतिक, पायाभूत आणि गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेत यशाची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सरपंच पूजा भिवरकर, चंद्रकांत जाधव, रवींद्र परमाळे, व्यंकटराव दडस, सचिन महामुनी आणि अभंग यांच्यासह शिक्षणप्रेमी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात देणगीदार व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तसेच फडतरे यांच्या वतीने उपस्थितांना गोड भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोरे यांनी केले. सूत्रसंचालन अभंग एस. बी., गावडे ए. पी. आणि लव्हाटे यांनी केले, तर शेवटी यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Spread the love