सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सहकार्याबद्दल मानले आभार
। लोकजागर वृत्त । फलटण । २१ ऑक्टोबर २०२६ ।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशात सर्वोत्तम बँक असून, आपले योगदान आणि बँकेचे शेतकऱ्यांप्रती असणारे योगदान यातून बँक आगामी काळातही आपले मानांकन आणि दर्जा कायम ठेवेल, अशी प्रतिक्रिया माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज २१ ऑक्टोबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघातील अन्य उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याने त्यांची ही निवड पूर्णपणे बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडीनंतर बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना कोणतेही अंतर्गत पक्षीय वाद झाले नसल्याचे स्पष्ट केले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. ही बिनविरोध निवड होण्यामागे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगत त्यांनी मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांचेही मनःपूर्वक आभार मानले. दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी ठीक ठिकाणी मोठा जल्लोष साजरा केला असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
