श्री सद्गुरू व महाराजा मल्टीस्टेटच्या सभासदांना लाभांश व कर्मचाऱ्यांना बोनस वाटप संपन्न

संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते लाभांश व बोनसचे वितरण; सद्गुरू पतसंस्था आणि महाराजा मल्टीस्टेटच्या कोट्यवधींच्या उलाढालीची आकडेवारी जाहीर.

। लोकजागर वृत्त । फलटण । २२ ऑक्टोबर २०२६ ।

संस्थेच्या आर्थिक प्रगतीत सभासदांचे नेहमीच मोलाचे योगदान असून, सभासदांचा अतूट विश्वास आणि सहकार्य यामुळेच संस्थेने प्रगतीची यशस्वी वाटचाल सुरू ठेवल्याचे प्रतिपादन श्री सद्गुरू व महाराजा उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले आहे. संस्थेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला, ज्यानुसार श्री सद्गुरू पतसंस्थेची स्थापना १९८९ साली झाली असून आज संस्थेच्या ठेवी ८० कोटी २८ लाख, कर्ज वाटप ५७ कोटी १२ लाख, नफा ६२ लाख ३० हजार आणि वार्षिक उलाढाल ८०३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच २०१० साली स्थापित झालेल्या महाराजा मल्टीस्टेटची ठेवण १२१ कोटी ५७ लाख, कर्ज वाटप ९१ कोटी ५६ लाख, वार्षिक उलाढाल १००० कोटी रुपये असून संस्थेला २ कोटी ३५ लाख रुपयांचा नेट नफा झाला असल्याची माहिती देण्यात आली. संस्थेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सर्व सभासदांना उत्तम सेवा देण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात श्री सद्गुरू पतसंस्थेचे सुनील सरगर आणि आनंद काळोखे यांना लाभांश वाटप करण्यात आले, तर महाराजा मल्टीस्टेटतर्फे उत्तम पवार, नागेश नागनसुरे आणि संपत पिसाळ यांना लाभांश वितरित करण्यात आला. याशिवाय आगामी दिवाळी सणाचे औचित्य साधून पतसंस्थेचे सेवक रूपेश देवरे, ज्योती इंगळे, प्रसन्ना टाळकुटे, अक्षय बागल, संतोष अडागळे आणि शार्दुल कलमदाने यांना प्रातिनिधिक स्वरूपात बोनसचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, मोठ्या संख्याने सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सीईओ संदीप जगताप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Spread the love