सातारा जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी उदयसिंह उंडाळकर, तर व्हाईस चेअरमनपदी दीपक चव्हाण बिनविरोध

| लोकजागर | सातारा | दि. १८ नोव्हेंबर २०२६ |

सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे. बँकेच्या नूतन चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची, तर व्हाईस चेअरमनपदी फलटणचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राजकीय समीकरणे आणि संख्याबळ
२१ जागांच्या संचालक मंडळात भाजपचे सर्वाधिक ९ संचालक निवडून आले होते. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ८ आणि शिवसेनेचे (शिंदे गट) ४ संचालक होते. सत्तेच्या समीकरणात राष्ट्रवादीचे ८ आणि शिवसेनेचे ४ असे १२ संचालक एकत्र येऊन चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपद आपल्याकडे घेण्यात या दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींना यश येईल असा अंदाज बांधला जात होता. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आणि निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

नेत्यांच्या बैठका आणि प्रतिक्रिया
निवडणुकीपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार नितीन पाटील यांच्यात महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या होत्या. त्यातून या युतीवर शिक्कामोर्तब झाले. दीपक चव्हाण हे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी नूतन चेअरमन उदयसिंह उंडाळकर यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली बँक अधिक सक्षमपणे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Spread the love