जिल्हा बँक उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार दीपक चव्हाण यांचे केले विशेष अभिनंदन
। लोकजागर वृत्त । फलटण । २० नोव्हेंबर २०२६ ।
पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीचा दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी फलटण येथे धावती भेट दिली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार दीपक चव्हाण यांचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त शिवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच भगवे झेंडे फडकावत त्यांचे अत्यंत जोरदार आणि जल्लोषात स्वागत केले. यावेळी युवा नेते तथा नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल दीपक चव्हाण यांचे अभिनंदन करत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काही वेळ फलटणमध्ये थांबल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले. या प्रसंगी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
