जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे नागरिकांना आवाहन; दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर पडणे टाळण्याच्या सूचना.
। लोकजागर । सातारा । १७ एप्रिल २०२६ ।
सातारा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, उष्मालाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना (Health Advisory) जारी केल्या आहेत. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काय करावे? (हे नक्की करा)
- पाण्याचे सेवन: तहान लागली नसली तरी दर एक तासाने पुरेसे पाणी प्या. प्रवासातही पिण्याचे पाणी सोबत ठेवा.
- घराबाहेर पडताना काळजी: दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना छत्री, टोपी किंवा ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकून घ्या.
- पेयांचा वापर: शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ओआरएस (ORS), घरी बनवलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक यांचा नियमित वापर करा.
- पोशाख: हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरा.
- घर थंड ठेवा: दिवसा घरातील पडदे आणि झडपा बंद ठेवा, तर रात्री थंड हवेसाठी खिडक्या उघड्या ठेवा. अधूनमधून थंड पाण्याने स्नान करा.
- कामाचे नियोजन: कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्या. कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी सावली आणि पिण्याच्या पाण्याची सोय करा.
- विशेष काळजी: गरोदर स्त्रिया, रुग्ण, लहान मुले आणि वृद्ध यांची अधिक काळजी घ्या.
- प्राण्यांची निगा: पाळीव गुरांना सावलीत (छावणीत) ठेवा आणि त्यांना पुरेसे पाणी द्या.
काय करू नये? (हे टाळणे हिताचे)
- व्यसने व पेये: दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये (Cold Drinks) घेणे टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
- आहार: उच्च प्रथिनयुक्त (High Protein) आणि शिळे अन्न खाऊ नका.
- अतिकष्ट: कडक उन्हात शारीरिक श्रमाची आणि कष्टाची कामे करणे टाळा.
- वाहनांबाबत काळजी: लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात सोडू नका.
- कपडे: गडद रंगाचे, घट्ट आणि जाड कपडे घालणे टाळा.
- स्वयंपाक: उन्हाच्या तीव्रतेच्या काळात (दुपारी) स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाकघरात मोकळी हवा राहील याची दक्षता घ्या.
महत्त्वाची सूचना: अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम किंवा चक्कर येणे ही उन्हाचा झटका बसण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा.
