गृह विभागाचे अवर सचिव प्रताप माडकर यांचे गौरवोद्गार
। लोकजागर वृत्त । दुधेबावी (ता. फलटण) । २१ नोव्हेंबर २०२६ ।
ग्रामीण भागात गेली २६ वर्षे संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दीपस्तंभासारखे कार्य दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान करत आहे. हा ज्ञानयज्ञाचा उत्सव अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे गृह विभागाचे अवर सचिव प्रताप माडकर यांनी काढले. दुधेबावी (ता. फलटण) येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित दुधेबावी फेस्टिव्हलअंतर्गत संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे होते. यावेळी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेश सोनवलकर, अजित कोकरे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर आणि उपसरपंच तानाजी नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रताप माडकर पुढे म्हणाले की, गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक परिवर्तनाची चळवळ प्रतिष्ठानने सातत्याने जिवंत ठेवली आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांसाठी वेळ आणि पैसा खर्च होत असला, तरी त्यातून होणारे समाजप्रबोधन आणि त्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम अधिक मोलाचे आहेत. संत गाडगेबाबा हे समाजपरिवर्तनाचे एक चालते-बोलते विद्यापीठ होते. केवळ उपदेश न करता स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही त्यांची तत्त्वे आजच्या काळातही तितकीच महत्त्वपूर्ण आहेत. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, तर प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले, तर त्यातून खरे आत्मिक समाधान मिळते. अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या काळात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे तसेच शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, हा संत गाडगेबाबांचा विचार होता. दुधेबावी प्रतिष्ठानची संत गाडगेबाबा व्याख्यानमाला आज संपूर्ण महाराष्ट्रात नावाजली जात आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे म्हणाले की, आम्ही शाळेत असल्यापासून दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी संत गाडगेबाबा व्याख्यानमाला पाहत आलो आहोत. या व्याख्यानमालेतून ज्ञानवंत व्याख्याते, अनुभवी अधिकारी आणि मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शन मिळत असल्याने गावातील युवकांना जीवनाची योग्य दिशा मिळत आहे. व्याख्यानमालेबरोबरच सर्वरोग निदान शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध समाजोपयोगी उपक्रम प्रतिष्ठान राबवत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी हे कार्य अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक ठरत आहे.
कार्यक्रमाचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले, तर प्रास्ताविक व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष सागर कराडे यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर आणि खजिनदार युवराज एकळ यांनी केले, तर आभार सचिव विठ्ठल सोनवलकर यांनी मानले. यावेळी दुधेबावीचे माजी सरपंच भाऊसाहेब मोरे, सोसायटीचे चेअरमन सचिन सोनवलकर, संपतराव आडके, भानुदास सोनवलकर, फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, माजी उपसरपंच अविनाश चांगण, अण्णासाहेब भुंजे, सर्जेराव सोनवलकर, भीमराव नाळे, पोपटराव सोनवलकर, उद्योजक राजेंद्र नाळे, किरण नाळे, वृक्षमित्र सचिन सोनवलकर, संदीप ठोंबरे आणि सौरभ एकळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
