भारतीय सैन्यात निवड झालेल्या प्रणव जाधवचा थेट नगराध्यक्षांकडून सन्मान; ‘पेन’ भेट देत समशेरसिंह नाईक निंबाळकरांनी दिली पाठीवर शाब्बासकीची थाप

रात्रीच्या वेळी गाडी थांबवून कौतुक; नगराध्यक्षांच्या संवेदनशील कृतीने मारवाड पेठेतील युवक भारावले.

। लोकजागर । फलटण । १९ मे २०२६ ।

देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करून भारतीय सैन्यात निवड झालेल्या मारवाड पेठेतील एका युवकाचा फलटण शहरात उत्साहात सत्कार करण्यात आला. मात्र या आनंदोत्सवाला खरी उंची मिळाली ती फलटणचे नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दाखवलेल्या कमालीच्या आत्मीयतेमुळे. त्यांच्या एका अत्यंत साध्या पण संवेदनशील आणि भावनिक कृतीने उपस्थित युवकांसह नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून सध्या शहरभर या प्रकरणाची कौतुकास्पद चर्चा सुरू आहे.

नुकतेच १५ मे रोजी रात्री नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे सातारा येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय कार्यक्रम आटोपून फलटण शहरात परतले होते. शहरात सुरू असलेल्या विकासकामांची तातडीने पाहणी करण्यासाठी ते नगरसेवक संदीप चोरमले यांच्या समवेत रात्रीच्या वेळी बाहेर पडले. ब्राह्मण गल्ली परिसरात सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते मारवाड पेठ मार्गे जात असताना, काही युवक एका तरुणाला खांद्यावर घेऊन जल्लोष करताना त्यांना दिसले. रात्रीच्या वेळी सुरू असलेला हा आनंदोत्सव पाहून नगराध्यक्षांनी तात्काळ आपली गाडी थांबवली आणि कौतुकाने विचारपूस केली.

यावेळी उपस्थित युवकांनी सांगितले की, हवालदार सुदाम भीमराव जाधव यांचे नातू तसेच सुभेदार देवदास जाधव यांचे चिरंजीव आणि ‘सूरज भिसे पाटील यांच्या स्वरूपा अकॅडमी’चा विद्यार्थी असलेल्या प्रणव देवदास जाधव याची भारतीय सैन्यात निवड झाली असून मित्रमंडळी हा आनंद साजरा करत आहेत. लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबातील या तरुणाच्या यशाची माहिती समजताच नगराध्यक्षांनी गाडीतून उतरून प्रणवचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

विशेष म्हणजे, सुरुवातीला शुभेच्छा देऊन नगराध्यक्ष पुढे निघून गेले होते. मात्र, काही अंतर गेल्यानंतर त्यांच्या मनात देशसेवा करणाऱ्या या युवकाबद्दलचा आदर इतका दाटून आला की त्यांनी पुन्हा गाडी थांबवली. ते परत युवकांजवळ आले आणि त्यांनी प्रणवला जवळ बोलावले. अत्यंत भावनिक होत नगराध्यक्ष म्हणाले, “माझ्याकडे तुला देण्यासाठी आत्ता काही नाही, पण माझ्याकडे हे पेन आहे. हेच तुला भेट म्हणून देतो. देशसेवेत मोठं नाव कमव.” असे म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातील पेन काढून प्रणवच्या कुडत्याच्या कॉलरला लावला आणि पाठीवर शाब्बासकीची थाप टाकली. नगराध्यक्षांच्या या अनपेक्षित आणि हृदयस्पर्शी कृतीमुळे उपस्थित तरुण भारावून गेले आणि संपूर्ण परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला. या भावनिक क्षणानंतर नगराध्यक्षांनी अत्यंत आपुलकीने सर्व युवकांसोबत छायाचित्रेही काढली. एका लोकप्रतिनिधीने कोणताही दिखावा न करता सामान्य सैनिकाच्या मुलाला दिलेल्या या सन्मानाचे सोशल मीडियावरही मोठे कौतुक होत आहे.

Spread the love