क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, सवाद्य मिरवणूक आणि सायकलस्वारांचा नृत्याचा ठेका
। लोकजागर वृत्त । फलटण । २३ नोव्हेंबर २०२६ ।
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या भक्तीपरंपरेचा, वारकरी संप्रदायाच्या एकात्मतेचा आणि सामाजिक बंधुभावाचा संदेश घेऊन निघालेल्या पंढरपूर ते घुमान चरणपादुका रथयात्रा व सायकल यात्रेचे फलटण नगरीत मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सदस्य तथा आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य स्वागत सोहळा पार पडला. यावेळी नामदेव शिंपी समाजातील बांधव-भगिनी, विविध पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या, ज्येष्ठ नागरिक आणि सायकल यात्रेतील सहभागींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शहरातील प्रमुख क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे सायकलस्वार व संत नामदेव महाराज यांच्या चरणपादुकांचे आगमन होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून चरणपादुका रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे तसेच सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या मान्यवरांचा व सायकलस्वारांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. संत नामदेव महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन घेऊन आमदार सचिन पाटील यांनी यात्रेतील सहभागींना शुभेच्छा दिल्या, तर याच वेळी फलटण तालुक्यातील समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आमदार सचिन पाटील यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या स्वागत सोहळ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी विठ्ठलनामाच्या गजरात धरलेला नृत्याचा ठेका. टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा जयघोष आणि भक्तिगीतांच्या तालावर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सायकलस्वारांनीही आपल्या प्रवासाचा थकवा बाजूला ठेवत आनंदाने नृत्याचा ठेका धरला. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ अशा गगनभेदी जयघोषांनी फलटणनगरी दुमदुमून गेली होती.
स्वागत व सत्कार सोहळ्यानंतर फलटण नगरपरिषद नियोजन व विकास समितीचे सभापती संदीप चोरमले, नगरसेवक किरण राऊत तसेच नामदेव शिंपी समाजातील बांधव-भगिनी आणि नागरिकांच्या उपस्थितीत सायकलस्वार व संत नामदेव महाराज यांच्या चरणपादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. वाद्यांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात ही मिरवणूक पुढे मार्गक्रमण करत शिंपी समाजाच्या विठ्ठल मंदिर येथे विसावली. यावेळी उपस्थित भाविकांनी मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेतले. या स्वागत सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी राजेंद्र कुमटेकर, विठ्ठल मंदिर शिंपी समाज ट्रस्टचे माजी अध्यक्ष महेश हेंद्रे, शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष विजय उंडाळे, माजी उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, संत नामदेव महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलभा मोहटकर, ज्येष्ठ समाजसेविका रेखा हेंद्रे, सुनील पोरे, मनीष जामदार, ज्ञानेश्वर भांबुरे, दिगंबर कुमठेकर, मृणाल पोरे, राजू पोरे, महेंद्र भांबुरे, गणेश पिसे, मुकुंद कुमठेकर, अभिषेक कुमठेकर, प्रकाश टाळकुटे, संचालक सोहम गाणबोटे आणि साप्ताहिक श्रीहरी सुभाषित सोशल मीडियाचे कार्यकारी संपादक यशराज भांबुरे यांच्यासह समाज बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूरच्या पवित्र भूमीतून पंजाबमधील घुमान या संत नामदेव महाराजांच्या वास्तव्याशी संबंधित पवित्र स्थळापर्यंत पोहोचणारी ही चरणपादुका रथयात्रा आणि सायकल यात्रा महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारी ठरत आहे. पंढरपूरपासून घुमानपर्यंतचा प्रवास सायकलवरून पूर्ण करण्याचा संकल्प करून मार्गक्रमण करणाऱ्या सायकलस्वारांनी भक्ती आणि शारीरिक जिद्दीचा सुंदर संगम घडवून आणला असून, फलटणकरांनी दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा ठरला आहे.
