५६ वा अंतरधर्मीय सत्यशोधक विवाह फलटणमध्ये संपन्न; संविधानाची शपथ घेऊन नवदांपत्य झाले विवाहबद्ध

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम; प्रा. श्रेयस कांबळे आणि प्रा. करिष्मा मुलाणी यांचा आदर्श विवाह सोहळा.

। लोकजागर । फलटण । ५ मे २०२६ ।

सत्यशोधक विवाह हा सत्यावर आधारित असून, सर्व जाती-धर्मांमध्ये त्याचे अनुकरण होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी केले. फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे औचित्य साधून प्रा. ॲड. करिष्मा मुलाणी आणि प्रा. श्रेयस कांबळे यांचा ५६ वा अंतरधर्मीय मोफत सत्यशोधक विवाह सोहळा फलटणमध्ये उत्साहात पार पडला.

विवाहाचे वेगळेपण आणि विधी:

  • जाधववाडी येथील अक्षत रेसिडेन्सीमध्ये रविवारी सायंकाळी ६ वाजता मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
  • विवाहाची अधिकृत नोंदणी करून महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी पार पाडण्यात आले.
  • पारंपरिक अक्षतांच्या ऐवजी सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला.
  • विवाह सोहळ्याची सुरुवात नवदांपत्याने हातात भारतीय संविधान आणि समग्र वाङ्मय घेऊन केली.
  • प्रा. सुदाम धाडगे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले, तर महात्मा फुले रचित मंगलाष्टकांचे सादरीकरण करण्यात आले.

संविधानिक मूल्यांचा संकल्प: यावेळी प्रा. श्रेयस कांबळे आणि प्रा. करिष्मा मुलाणी यांनी शपथपत्र वाचन करून संविधानिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा आणि निर्भय समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित पाहुण्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ आणि गुलाबाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. विधीकर्ते रघुनाथ ढोक यांच्या हस्ते नवदांपत्याला सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि फुले दांपत्याची प्रतिमा भेट देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती: या सोहळ्याला पत्रकार विकास शिंदे, पत्रकार जयदीप भगत, ज्येष्ठ समाजसेवक दादा कांबळे, विजय आमने, लॉ कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नवदांपत्याच्या या कृतीशील आणि क्रांतिकारी निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Spread the love